५०८.९५ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश
पणजी : अग्निशामक दलाला एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान १,४१२ व्यक्तींचे प्राण वाचवण्यात यश आले. याचाच अर्थ दलाने वर्षाला सरासरी २३५ जणांना जीवदान दिले आहे. वाचवण्यात आलेल्या एकूण व्यक्तींपैकी २५ जण हे आगीच्या संबंधित घटनांमधील तर १,३८७ जण हे अन्य स्वरुपाच्या आपत्कालीन घटनांमध्ये सापडले होते. दरम्यान, दलाने ५०८.९५ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवली आहे. आर्थिक सर्व्हेक्षण २०२४-२५ मधून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, २०१९-२० ते २०२४-२५ (डिसेंबर अखेरीस) अग्निशामक दलाला आगीच्या घटनांचे १४ हजार ८६९ कॉल तर अन्य आपत्कालीन घटनांचे २८ हजार ८१६ कॉल आले होते. याचाच अर्थ दलाला महिन्याला सरासरी ६२४ कॉल आले होते. यादरम्यान दलाला ३,९६८ जनावरांना वाचवण्यात यश आले. वरील कालावधीत आगीच्या व अन्य आपत्कालीन घटनांमध्ये १,७५० व्यक्तींचा मृत्यू झाला. तर, १६६ जण जखमी झाले. यादरम्यान ३०३ जनावरांचा मृत्यू झाला. ३१ जनावरे जखमी झाली.
वरील कालावधीत आगीच्या घटनांत १८४.८६ कोटी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. यामध्ये २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ८१.०४ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तर २०२३-२४ मध्ये खात्याने सर्वाधिक १७८.६५ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवली होती. तर २०२-२१ मध्ये १३.१३ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले होते. आगीच्या घटना घडू नयेत यासाठी दलातर्फे वेळोवेळी खासगी आस्थापनांची तपासणी केली जाते. वरील काळात दलाने सुमारे १६ हजार आस्थापनांची तपासणी केली होती.
१७ हजार जणांना प्रशिक्षण
खात्यातर्फे आगीच्या घटना घडू नयेत यासाठी दलातर्फे खासगी अस्थापानांतील व्यक्तींना मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आग विझविण्याच्या उपाययोजना, सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीसाठी करायची तयारी आदी गोष्टी शिकवल्या जातात. वरील कालावधीत खात्याने १७ हजार ४३९ व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे.