वेश्या व्यवसाय : ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश

आयुर्वेद सेंटरमध्ये छापा टाकून दोन महिलांची केली होती सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 12:25 am
वेश्या व्यवसाय : ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २०२२ मध्ये तिसवाडी तालुक्यातील एका आयुर्वेद सेंटरमध्ये छापा टाकून दोन महिलांची सुटका केली होती. या प्रकरणी प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्या. अपूर्वा नागवेकर यांनी दिला आहे.
गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश गावडे याच्या नेतृत्वाखाली महिला साहाय्यक उपनिरीक्षक शीतल नाईक, हवालदार कृष्णा माजिक, महिला हवालदार प्राप्ती नाईक, कॉन्स्टेबल साजरो मांद्रेकर, महिला गृहरक्षक सुचित्रा घाडी हे पथक साध्या वेशात २१ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी उत्तर गोव्यात गस्तीवर होते. त्या पथकाला पणजीत आयुर्वेद सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली.
त्यानुसार पथकातील एकाला बनावट ग्राहक म्हणून तयार करून त्याला २००० रुपये देण्यात आले. त्यानंतर बनावट ग्राहकाने गुप्तहेरांनी सांगितलेल्या पणजीतील एका आयुर्वेद सेंटरमध्ये पाठविण्यात आले. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पथकाने दोघा महिलांची सुटका केली. त्या दोघांची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी केली.

ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल 
या प्रकरणी गुन्हा शाखेचे तत्कालीन निरीक्षक सतीश गावडे यांनी सेंटर चालविणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा शाखेने वरील ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात ३ ऑक्टोबर २०२२ रोजी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने बनावट ग्राहकाची तसेच पीडित महिलेची व पथकातील सदस्यांच्या जबाबाची दखल घेत वरील निरीक्षण नोंदवले. त्यानुसार, वेश्याव्यवसाय प्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.      

हेही वाचा