चित्रपट रिलीज न करण्याचा मनसेचा इशारा
मुंबई : पाकिस्तानी चित्रपट कलाकार फवाद खानचा हिंदी चित्रपट 'अबीर गुलाल'चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. प्रेमकहाणी असलेला हा चित्रपट ९ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार असून हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
भारतात रिलीज केल्या जाणाऱ्या पाकिस्तानी चित्रपटाविरोधात मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊच देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, 'पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावे लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार'. आम्ही या चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती गोळा करत आहोत आणि त्यानंतर त्यावर आमचे संपूर्ण विधान मांडू.
तुम्ही तुमच्याच देशात काम करणे चांगलेः संजय निरुपम
फवाद खानच्या चित्रपटाबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम म्हणाले, 'भारतात पाकिस्तान बद्दल प्रचंड द्वेष आहे. जेव्हा पाकिस्तानातून एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा भारतीय लोकांना तो पहायला आवडत नाही. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये फारसे लोकप्रिय होत नाहीत. म्हणूनच पाकिस्तानी स्टार भारतात कधीही यशस्वी होऊ शकले नाहीत. मी पाकिस्तानी लोकांना सल्ला देईन की चित्रपटासाठी भारतीय बाजारपेठ शोधण्याऐवजी त्यांच्याच देशात काम करणे चांगले.
'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' ला सुद्धा विरोधः
भारतात 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केला आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे सांगून विरोध केला होता. आता 'अबीर गुलाल' मध्येही त्याच कहाणीची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसते आहे.