बहुढंगी गजराज राव

गजराज राव भूमिकेची लांबी न बघता, काम करत राहतात. त्यांच्या अनेक भूमिका तुमच्या लक्षात आहेत. गजराज राव यांची नवी मालिका ‘दुपहीया’ विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा. गजराज राव हे एक लोकप्रिय भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या प्रभावी अभिनयाने सर्वांना भुरळ घातली आहे.

Story: हर्षदा वेदपाठक |
06th March, 09:00 pm
बहुढंगी गजराज राव

प्रश्न : बरेचदा चित्रपटाच्या पटकथा खूप मोठ्या असतात. असे असताना काही कलाकारांना स्वतःहून त्यात काही योगदान द्यायचे असते. तुम्हीही असे कधी योगदान दिले आहे का?

गजराज राव : कसे असते की, जेव्हा तुम्ही एखादा गंभीर विषय मांडत असता. तेव्हा त्यात आपण काही भर घालण्याची संधीच नसते किंवा त्याची तशी गरजही नसते. पण जेव्हा तुम्ही विनोदी कथेवर काम करता तेव्हा त्यात हे स्वातंत्र्य घेतले जाऊ शकते.

प्रश्न : लहान शहर किंवा गावाकडच्या कथानकांचा प्रभाव खूप मोठा असतो असे तुम्हाला वाटते का?

गजराज राव : पूर्वी काय व्हायचे की, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील लेखक हे सत्तर ऐंशीच्या दशकात आलेल्या सिनेमात दाखवलेल्या गावाचे रुपड नजरेसमोर धरून वातानुकुलित खोलीत बसून कथानक लिहायचे आणि आपल्याला वाटायचे की हेच ग्रामीण जीवन आहे. आज तसे होत नाही. आज लेखक लहान शहरातून आणि गावातून येत आहेत आणि ते स्वत:चे अनुभवच लिहित आहेत. त्यामुळे जो गावाकडची लोक आहेत ते या कथा किंवा घटनाबरोबर रिलेट करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक तर जनता ही गावात राहते, त्यामुळे अशा कथानकाचा प्रभाव हा मोठाच असतो.


प्रश्न : चित्रपट स्वीकारण्यापूर्वी तुम्ही कथेत नेमके काय पाहता?

गजराज राव : मी कथेत काही वेगळे शोधण्याचा प्रयत्न करतो. वेगळी कथा, वेगळी व्यक्तिरेखा बघण्याचा प्रयत्न करतो. आता माझ्या वयाच्या मानाने मला जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी जास्तीत जास्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो.

प्रश्न : पुढे कधी चित्रपट दिग्दर्शन करण्याचा तुमचा विचार आहे का?

गजराज राव : हो नक्कीच. एका कथेवर काम देखील सुरू आहे. कदाचित पुढील १ ते २ वर्षांत काम पूर्ण होईल.

प्रश्न : मग तुम्ही चित्रपट करणार आहात की मालिका?

गजराज राव : आता चांगल्या कथानकांची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे आता ही कथा ऐकायला आणि ती करायला कोण तयार असेल त्यावर अवलंबून आहे की याचा चित्रपट बनेल की मालिका.

प्रश्न : सर्व वयोगटात तुमचा फॅन फॉलोईंग वाढला आहे. कसे वाटते?

गजराज राव : खूपच छान वाटते. सगळे काही मिळाल असे मला वाटते.

प्रश्न : लोक चित्रपट पाहायला चित्रपटगृहांकडे जात नाहीत, या क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून तुम्हाला या गोष्टीचे वाईट वाटते का?

गजराज राव : मला वाटते की, ही एक प्रकारच्या उत्क्रांतीची अवस्था आहे. बघा, ९० च्या दशकात रेडीओला फार महत्त्व होते. टेलीविजन आल्यावर रेडीओ आता बंद होणार असे वाटल होते. पण तसे झाले नाही. नंतर व्हीसीआर आले तेव्हा चित्रपटगृह बंद होतील असे वाटले होत. पण तसेही काही झाले नाही. आता तर मनोरंजन लोकांच्या मोबाईलमध्ये आहे. ते स्वत:च्या घरातून रील्स बनवत आहेत. तो पण तर सिनेमा आहे. हे सिनेमाचंच पुढचे पाऊल आहे, असे मला वाटते.