
या आठवड्यात शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये दुल्कर सलमानच्या ‘कांथा’ पासून राधिका आपटेच्या ‘साली मोहब्बत’ या चित्रपटांचा समावे आहे.
कांथा । नेटफ्लिक्स
‘सीता रामाम्’ या चित्रपटातून अनेकांची मने जिंकणारा अभिनेता दुल्कर सलमान यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘कांथा’ हा चित्रपट अलीकडेच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा १९५० च्या दशकातील मद्रास येथील आहे. हा चित्रपट लोकप्रिय दिग्दर्शक समुथिरकानी आणि त्यांचे सुपरस्टार शिष्य टी. के. महादेवन यांच्यामध्ये एका प्रोजेक्टवरून झालेल्या वादावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये अभिनेता राणा दग्गुबाती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 
साली मोहब्बत । झी ५
हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. राधिका आपटे यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. ती यामध्ये स्मिता या गृहिणीची भूमिका साकारत आहे. चुलत भावाच्या आणि नवऱ्याच्या निधनानंतर तिच्या आयुष्यात वेगळेच वळण येते आणि ती दोन मर्डर केसमध्ये सामील असल्याचे उघड होते, अशी या चित्रपटाची कथा आहे.
सिंगल पापा । नेटफ्लिक्स
‘सिंगल पापा’ या सीरिजमध्ये कुणाल खेमु मुख्य भूमिकेत आहे. जो यामध्ये गौरव गहलोत हे पात्र साकारत आहे. यामध्ये त्याचा घटस्फोट झाल्यानंतर तो लगेच मुलाला दत्तक घेण्याचा विचार करतो. पण यामुळे त्याच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसतो. यामध्ये प्राजक्ता कोळी, मनोज पहावा, नेहा धुपिया हे कलाकार पाहायला मिळतात.
द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली । जिओ हॉटस्टार
ही एक कॉमेडी सीरिज आहे, ज्यामध्ये बानी अहमद नावाच्या तरुण लेखकाची कथा दाखविण्यात आली आहे. यामध्ये कृतिका कामरा, श्रेया धन्वंतरी, शीबा चड्ढा आणि फरीदा जलाल हे कलाकार पाहायला मिळतात. ही सीरिज बानी (कृतिका) नावाच्या लेखिकेच्या अवती भोवती फिरते, जी व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत असते.
३ रोझेस सीझन २ । अहा
या मालिकेत मुंबईतील तीन मैत्रिणींची गोष्ट आहे. ज्या एक अॅड एजन्सी सुरू करतात. पण, फ्रान्सवरून आलेल्या एका गँगस्टरच्या जाळ्यात त्या अडकतात. यामध्ये ईसा रेब्बल, राशी सिंह आणि कुशीता कल्लापु या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
एफ १ : द मुव्ही । अॅपल टीव्ही+
ब्रॅड पिटचा थरारक स्पोर्ट्स चित्रपट एफ १ : द मुव्ही या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. कथा एका १९९० च्या दशकातील कुशल ड्रायव्हरभोवती फिरते ज्याचे करिअर एका भीषण अपघातामुळे जवळजवळ संपते. अनेक वर्षांनंतर त्याला पुन्हा स्वप्न जगण्याची संधी मिळते, जेव्हा त्याचा जुना सहकारी फॉर्म्युला १ टीम मालक त्याला एका नवख्या ड्रायव्हरसह ट्रॅकवर परतण्याची ऑफर देतो. या चित्रपटात जॅव्हियर बार्डेम, केरी कॉन्डन आणि डॅमसन इड्रिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आउट मिस्ट्री | नेटफ्लिक्स
नाइफ्स आउट फ्रँचायझीतील तिसरा भाग असलेला हा चित्रपट ग्लास ओनियन (२०२२) नंतरचा स्वतंत्र सिक्वेल आहे. यात पुन्हा डॅनियल क्रेग करिष्माई गुप्तहेर बेनोई ब्लाँकच्या भूमिकेत आहे. तो न्यूयॉर्कमधील एका छोट्या धार्मिक समुदायाच्या तरुण नेत्यासोबत मिळून ‘अशक्य’ वाटणाऱ्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करतो.
सिटी ऑफ शॅडोज । नेटफ्लिक्स
लेखक अरो साईन्झ दे ला माजा यांच्या पहिल्या कादंबरीवर आधारित ही सहा भागांची स्पॅनिश क्राइम थ्रिलर मिनी-सीरिज आहे. बार्सिलोना शहरातील गाऊडीच्या प्रसिद्ध इमारतीत जळत्या अवस्थेत लटकलेला मृतदेह सापडतो. यामुळे मिलो मलार्ट नावाचा बदनाम गुप्तहेर पुन्हा सेवेत परततो. तपास पुढे जात असताना तो गुन्हेगारीच्या काळ्या जाळ्यात अडकतो. मालिकेत व्हेरोनिका एचेगी यांचाही सहभाग आहे.