
या आठवड्यात प्रेक्षकांसाठी भरगच्च मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध होत आहे. रश्मिका मंदाना हिच्या ‘द गर्लफ्रेंड’पासून ते भीतीचा थरकाप उडवणाऱ्या ‘डायज् इरा’ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘स्टिफन’ पर्यंत विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट व वेबशोज प्रदर्शित होत आहेत.
द गर्लफ्रेंड। नेटफ्लिक्स
रश्मिका मंदाना अभिनीत हा येणाऱ्या वयातील बदलांवर आधारित ड्रामा एका कॉलेज विद्यार्थिनीची कथा सांगतो. तिचे आपल्या सिनियरवर प्रेम जडते, परंतु ही साधी कॉलेज लव्हस्टोरी लवकरच एक वेगळ्या नात्यात रूपांतरित होते. पुढे तिच्या स्व-ओळखीचा शोध, आत्मविश्वास आणि विषारी नात्यातून मुक्त होण्याच्या धैर्याची भावनिक कथा यात पाहायला मिळते.

स्टीफन । नेटफ्लिक्स
हा डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. एका मानसोपचार तज्ज्ञाला स्वतःला सीरियल किलर म्हणणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्याची जबाबदारी मिळते. नऊ मुली बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात मनोविश्लेषण करताना त्याला संशय येऊ लागतो की हा आरोपी खरा गुन्हेगार आहे का, की एखाद्या मोठ्या खेळातील बळी आहे.

जे केली । नेटफ्लिक्स
जॉर्ज क्लूनी आणि अॅडम सँडलर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा हृदयस्पर्शी कॉमेडी चित्रपट एका वृद्ध होत चाललेल्या फिल्म स्टारभोवती फिरतो. तो आपल्या मॅनेजरसोबत अचानक युरोपच्या प्रवासाला निघतो. या प्रवासादरम्यान दोघेही फ्लॅशबॅकद्वारे भूतकाळातील नातेसंबंध आणि घेतलेल्या निर्णयांवर चिंतन करतात.

डाईज इरा । जिओ हॉटस्टार
राहुल सदाशिवन दिग्दर्शित हा भयपट एका अहंकारी, श्रीमंत आर्किटेक्टभोवती फिरतो. एका वर्गमैत्रिणीच्या अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या घरातून एक स्मृतीचिन्ह घेण्याच्या चुकीच्या क्षणामुळे त्याच्या आयुष्यात उलथापालथ होते. रहस्याचा शोध घेत असताना त्याला एका भयावह अलौकिक शक्तीचा आणि धक्कादायक रहस्याचा उलगडा होतो.
लव्ह अँड वाईन । नेटफ्लिक्स
हा हृदयाला भिडणारा रोमँटिक कॉमेडी चित्रपट एका श्रीमंत वाईन फार्मच्या वारसाबद्दल आहे. तो केवळ पैशासाठी नाही, तर व्यक्तिमत्त्वासाठी प्रेम केले जावे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्या लहानपणीच्या मित्राशी आयुष्याची अदलाबदल करतो. त्याचदरम्यान त्याचे एका मेडिकल विद्यार्थीनीवर प्रेम जडते आणि पुढे एक सुंदर प्रेमकहाणी उलगडते.
कुत्तराम पुरींधवन । सोनीलिव्ह
हा रोमहर्षक क्राइम थ्रिलर एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या गावातील फार्मासिस्टवर आधारित आहे. साधे आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबातील मुलगी अचानक बेपत्ता होते. निर्दोष सिद्ध होण्यासाठी तो एका पोलीस अधिकाऱ्यासोबत अनपेक्षित अशी हातमिळवणी करतो.
द न्यू यॉर्कर अॅट १०० । नेटफ्लिक्स
या रोचक डॉक्युमेंटरीमध्ये द न्यू यॉर्कर मासिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त त्याच्या संपादकीय टीमचे कामकाज, दैनंदिन प्रक्रिया आणि सांस्कृतिक वारसा याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. साहित्य, विनोद आणि पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मासिकाचा १०० वर्षांचा प्रवास इथे उलगडतो.
द ग्रेट प्री-वेडिंग शो । झी ५
हा हलकाफुलका, मनोरंजक चित्रपट एका छोट्या गावातील फोटोग्राफरची कथा सांगतो. एका मोठ्या प्री-वेडिंग शूटचे फोटो असलेले मेमरी कार्ड हरवल्यामुळे त्याची मोठी अडचण होते. ग्राहकांना समजण्यापूर्वी तो हे कार्ड परत मिळवू शकेल का, यावर कथानक आधारित आहे.
द प्राईज ऑफ कन्फेशन । नेटफ्लिक्स
हा श्वास रोखून धरणारा कोरियन मिस्ट्री थ्रिलर एका कला शिक्षिकेची कथा सांगतो. पतीच्या खुनाचा आरोप तिच्यावर लागतो. याच वेळी एक गूढ व्यक्ती तिच्यासमोर हजेरी लावून तिचे आयुष्य वाचवण्याचा प्रस्ताव ठेवते. पण त्याची किंमत असते ‘एक खुनाची कबुली’. ती पुढे काय निवडेल?