ड्रॅगन : गुंतवणूक ३६ कोटी; कमावले १०० कोटी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th March, 08:52 pm
ड्रॅगन : गुंतवणूक ३६ कोटी; कमावले १०० कोटी

अनुपमा परमेश्वरन आणि प्रदीप रंगनाथन स्टारर ‘रिटर्न ऑफ द ड्रॅगन’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. अश्वथ मारिमुथु दिग्दर्शित हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि १० दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हा चित्रपट तमिळ तसेच तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. हा चित्रपट एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याबद्दल आहे जो नापास होतो आणि त्याच्या प्रेयसीशी ब्रेकअप करतो.

३६ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ड्रॅगन या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि १० दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला. जर आपण जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर, चित्रपटाने तामिळनाडूमध्ये ५१.२५ कोटी, तेलुगू राज्यांमध्ये १३.६५ कोटी, कर्नाटकमध्ये ७.३० कोटी आणि परदेशात २१.८० कोटींची कमाई केली आहे, यासह चित्रपटाने १०० कोटींचा टप्पाही ओलांडला आहे.

आमिर खानने केले चित्रपटाचे कौतुक

हिंदी अभिनेता आमिर खानने अभिनेते प्रदीप रंगनाथन यांना फोन करून त्यांचे कौतुक केले आहे. या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्याने स्वतः ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली. चित्रपटाच्या टीमने केक कापून चित्रपटाने १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केल्याचा आनंद साजरा केला आणि उत्साहाने आपला आनंद व्यक्त केला.

अलीकडेच, हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, रजनीकांत यांनी ड्रॅगन टीमला शुभेच्छा दिल्या. रजनीकांत हे तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी या तरुण स्टारची भूमिका असलेल्या ड्रॅगन चित्रपटाच्या टीमला त्यांच्या प्रचंड यशाबद्दल अभिनंदन केले. अभिनेता रजनीकांत यांनी ड्रॅगन चित्रपटाचे दिग्दर्शक अश्वथ यांना वैयक्तिकरित्या फोन करून त्यांची प्रशंसा केली आहे.