सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ असले तरी विरोधक तीव्र विरोध करण्याची शक्यता
दिल्ली : देशभरात वादग्रस्त आणि चर्चेचा मुद्दा ठरलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता विधेयक सभागृहात मांडले जाईल. यावर चर्चा करण्यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी ८ तासांची मुदत दिली आहे.
सत्ताधारी भाजपने आपली तयारी पूर्ण केली असून, आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगणारा तीन ओळींचा व्हीप जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत. सत्ताधारी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष तेलगू देसम पक्ष आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलावर या विधेयकाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
जेडीयूने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे साहजिकच केंद्र सरकारची आज अग्निपरीक्षा असणार आहे.
वक्फ विधेयकावरील ही चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला ‘एनडीए’तील नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त), तेलुगु देसम आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा पाठिंबा लागणार आहे.