भाजप-मगो युतीचा निर्णय योग्यवेळीच : दामू नाईक

चाळीसही मतदारसंघांत पक्षाला बळकट करणे हेच ध्येय


01st April, 11:26 pm
भाजप-मगो युतीचा निर्णय योग्यवेळीच : दामू नाईक

पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक. सोबत इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकण्यासाठी चाळीसही मतदारसंघांत पक्षाचा पाया बळकट करण्यावर आपण भर दिलेला आहे. भाजप-मगो युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर भाजप-मगो युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मगोचे नेते सुदिन आणि दीपक ढवळीकर यांनी दिल्लीत जाऊन यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष म्हणून युतीबाबत तुमची भूमिका काय, असा प्रश्न केला असता दामू नाईक म्हणाले, चाळीसही मतदारसंघांत पक्षाचा पाया मजबूत करणे हीच आतापर्यंतची माझी ठाम भूमिका आहे. त्यासाठी सर्वच मतदारसंघांत मेळावे सुरू आहेत. पक्षावर नाराज असलेल्यांना तसेच पक्षापासून दूर गेलेल्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्य सरकार स्थिर आहे. सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थितरीत्या पूर्ण करेल. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी वीस महिने शिल्लक आहेत. योग्यवेळीच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
युतीसाठी सर्व्हेचा होतो विचार
युतीच्या गोष्टी वर वर होत नसतात. त्यासाठी पक्षाचा सर्व्हे असतो. सर्व्हे तसेच बैठकांचा वृत्तांत केंद्रीय नेतृत्वाला सादर करावा लागतो. त्यावर भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊनच युतीचा निर्णय घेतला जातो, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
जे सांगायचे ते केंद्रीय नेतृत्वाला सांगितले आहे !
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत विचारले असता, जनतेचे हित लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष या नात्याने जे केंद्रीय नेतृत्वाला सांगायचे, ते आपण सांगितले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मला केंद्रीय नेतृत्व दिल्लीत बोलावून घेऊन मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत निर्णय घेईल, असेही दामू नाईक यांनी सांगितले.              

हेही वाचा