मुख्यमंत्री, दामूंसह एक मंत्रीही वरिष्ठांच्या बैठकांना उपस्थित
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह एक मंत्रीही दिल्लीत दाखल झालेला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने या सर्वांच्या केंद्रीय नेत्यांशी पुन्हा एकदा बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली दौरा करून मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि दामू नाईक दोघेही दिल्लीला गेले होते. या दोघांनाही पुन्हा मंगळवारी दिल्लीत बोलावण्यात आले होते. पण, त्याआधीच हे दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत एक मंत्रीही दिल्लीत दाखल झाल्याने राज्याचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
तीन दिवसांपूर्वी प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येईल. एका-दोघा मंत्र्यांना डावलण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेचच ते दिल्लीत दाखल झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदल कोणत्याही क्षणी होऊ शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
फायदा बघूनच नावांवर चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका-दोघा मंत्र्यांना वगळले जाईल असे म्हटले असले, तरी तीन ते चार निष्क्रिय मंत्र्यांना वगळण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा सुरू आहे. त्यापैकी काहींची नावेही निश्चित करण्यात आलेली आहेत.
आगामी दोन वर्षांत जिल्हा पंचायत, पालिका, तसेच विधानसभा निवडणूक आहे. या सर्वच निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्याचे ध्येय भाजपने ठेवलेले आहे. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याने ज्यांना मंत्री म्हणून संधी द्यायची आहे, त्यांचा या निवडणुकांत कितपत फायदा होईल, यावर दिल्लीतील बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे.
विद्यमान मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नाही. त्यामुळे एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती भाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल, त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाला हानिकारक ठरू शकते का, आणि तसे झाल्यास त्यांची नाराजी कशी घालवायची, याबाबतही केंद्रीय नेतृत्वाने गेल्या काही बैठकांमध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा केलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली धर्मेंद्र प्रधान यांची भेट
नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. मंत्री धर्मेंद्र यांचे वडील देबेंद्र प्रधान यांचे नुकतेच निधन झाले. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सांत्वन केले.