भाजप कोअर समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पणजी : राज्यातील विविध भागांतील अनधिकृत घरे तसेच बांधकामांमध्ये गोमंतकीयांच्या बांधकामांचाही समावेश आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय सरकारने विचारपूर्वक घ्यावा, अशी मागणी भाजप कोअर समितीच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. भाजप-मगो युतीच्या विषयावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी 'गोवन वार्ता'शी बोलताना सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारी, कोमुनिदाद तसेच रस्त्यांलगतची अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी संबंधितांना १५ दिवसांचा अवधी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला आहे. पण, अशा बांधकामांत परप्रांतीयांसमवेत गोमंतकीयांची घरे आणि इतर बांधकामांचाही समावेश आहे.
त्यांची बांधकामे उध्वस्त केल्यास आगामी काळातील निवडणुकांत पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारने अशा बांधकामांबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी कोअर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली.
दरम्यान, भाजपसोबत सत्तेत असलेल्या मगो पक्षासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमुळे या दोन्ही पक्षांतील युती आगामी काळातील निवडणुकांत राहणार की नाही, असा प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
त्यामुळे हा विषय कोअर समितीच्या बैठकीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, या विषयावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आणि निवडणुकांच्या तयारीबाबत दीर्घकाळ चर्चा झाल्याचेही सूत्रांनी नमूद केले.