भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना भेटून केली युतीच्या भविष्याबाबत चर्चा
पणजी : प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षासंदर्भात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर मंत्री गोविंद गावडेंकडून होत असलेल्या टीकास्रांच्या पार्श्वभूमीवर मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर आणि पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन थेट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली.
बी. एल. संतोष यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ढवळीकर बंधूंनी भाजप-मगो युती गोव्यातील पुढील निवडणुकांत किती महत्त्वाची आहे, हे संतोष यांना पटवून दिले. गोमंतकीय जनतेने भाजप-मगो युतीवर विश्वास ठेवला आहे. या दोन्ही पक्षांतील युती पुढील निवडणुकांत कायम रहावी, अशी गोमंतकीय जनतेची इच्छा आहे.
त्यामुळे मंत्री आणि भाजप आमदारांनी मगोसंदर्भात कोणतीही वक्तव्ये करू नये असे निर्देश केंद्रीय नेतृत्वाने द्यावे, अशी विनंती ढवळीकर बंधूंनी संतोष यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी 'गोवन वार्ता'शी बोलताना दिली.
चार दिवसांपूर्वी प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघ भाजपकडेच राहील. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी आताच बाहेर निघावे असे म्हणत मगोला चिमटा काढला. तेव्हापासून मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे मगो आणि ढवळीकर बंधूंवर तुटून पडले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांत दहा हत्तींचे बळ आल्याचे सांगत, सध्याचा मगो पक्ष भाऊसाहेबांचा राहिलेला नाही. हा पक्ष सध्या माधवरावांच्या गोठ्यातील पक्ष झाला आहे. भाजपला मगोच्या युतीची गरज नाही, अशी टीका मंत्री गावडे यांनी केली. शिवाय हिंमत असल्याने ढवळीकर बंधूंनी पक्षाचे अध्यक्षपद बहुजन समाजातील नेत्याला द्यावे, असेही आव्हानही त्यांनी दिले होते.
यामुळे भाजप-मगोतील युतीतील कुरबुरी जनतेसमोर आल्यामुळेच ढवळीकर बंधूंनी मंगळवारी दिल्लीत जाऊन थेट बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.