पणजी बाजारात दोन हजार रुपये डझन दराने विक्री
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मानकुराद आंबा ‘जमिनीवर’ आला आहे. पणजी बाजारात मानकुराद व हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. मागील आठवड्यात ५,५०० रुपये डझन असलेला मानकुराद सध्या दीड ते दोन हजार रुपये डझन दराने विक्री केला जात आहे. मात्र हे आंबे लहान ते मध्यम आकाराचे आहेत. लहान हापूस आंबे ८०० रुपये, तर मध्यम आकाराचे आंबे १३०० रुपये डझन दराने विकले जात आहेत.
सोमवारी पणजी बाजारात लालबाग आंबा १५० रुपये किलो, तोतापुरी आंबे १८० रुपये, सिंदुरी आंबे २०० रुपये, तर पायरी आंबे ३०० रुपये किलो दराने विकले जात होते. मध्यम आकाराच्या कैऱ्या १०० रुपयांना १० नग या दराने विकल्या जात होत्या. मध्यम आकाराचा नारळ ४० रुपये, तर मोठा नारळ ५० रुपये नग होता. मागणी जास्त पण आवक कमी असल्याने लिंबाचे दर वाढवून १० रुपयांना एक नग मिळत आहे.
बाजारात टोमॅटो आणि बटाट्याचे दर १० रुपयांनी वाढून अनुक्रमे ४० आणि ५० रुपये किलो झाले. कांदा ४० रुपये किलो होता. मिरची १२० रुपये किलो, तर ढब्बू मिरची ८० रुपये किलो होती. बाजारात काकडीचे दर ५० रुपये किलो होते. गाजर ६० रुपये किलो होते. मटारचे दर १०० रुपये किलो होते. कोबीचा एक गड्डा ४० रुपये, तर फ्लॉवरचे दर ३० रुपये होते. भेंडी ६० रुपये, तर कारले, ढब्बू मिरची प्रत्येकी ८० रुपये किलो होते. वालपापडी १२० रुपये किलो होती. शेवग्याच्या शेंगाचे दर कमी होऊन १२० रुपये किलो झाले. मेथी २० रु., शेपू १५ रु., पालक १० रु., कांदा पात १० रु., तर तांबडी भाजी १० रु. होते.