१८ जून, एबी रस्ता, पिसुर्लेकर रस्त्यांची कामे स्मार्ट सीटीअंतर्गत होणार नाहीत

पणजी स्मार्ट सीटीची ९० टक्के कामे पूर्ण, डेडलाईनचे पालन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 04:32 pm
१८ जून, एबी रस्ता, पिसुर्लेकर रस्त्यांची कामे स्मार्ट सीटीअंतर्गत होणार नाहीत

पणजी : सेंट्रल ड्रेनेजमुळे (मध्यवर्ती गटार यंत्रणा) पणजीतील १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर रस्ता व पिसुर्लेकर रस्त्याचे काम स्मार्ट सीटी अंतर्गत करता येणार नाही. सरकारला याबाबत कळविण्यात आले आहे. स्मार्ट सीटीची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे रस्त्यांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण झाली आहेत, अशी माहिती इमेजीन पणजी स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी दिली.

स्मार्ट सीटीअंतर्गत सुरू असलेली कामे व डेडलाईनची माहिती देण्यासाठी स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी पत्रकार परिषदेत घेतली. एका याचिकेप्रकरणी स्मार्ट सीटीतर्फे २७ जानेवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. यातील कामाच्या डेडलाईनचे पालन स्मार्ट सीटीकडून झाले आहे.

सांतिनेज व कॅफे भोसले चौकातील रस्त्यांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन होती. याप्रमाणे कामे पूर्ण झालेली आहेत. रंगकाम, सायनेज, बिटामिनचा थर तसेच काही किरकोळ कामे ३१मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील. पूर्ण झालेल्या रस्त्यांचे क्युरींग झाल्याशिवाय काही कामे पूर्ण करता येणार नाहीत, यासाठी विलंब झाला आहे. झाडे लावण्यासह लँडस्केपिंगचे काम ३१ मे २०२५पर्यंत पूर्ण केले जाईल.

ताड माड : वडाचे झाड, घुमटी सुरक्षित
ताड माड येथील वडाचे झाड व घुमटीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हा रस्ता २०० मीटर लांब असून २०० मीटरपैकी १२० मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या खाली पाणी असल्याने कामाला विलंब होत आहे.

पाणी काढण्यासाठी ८० बोरवेल खणण्यात आल्या आहेत. मलनिस्सारणाची पाईपलाईन बरीच खोल आहे. यासाठी कामाला उशीर होत आहे, असे संजीत रॉड्रिग्ज यांनी सांगितले. रायबंदर येथील फेरीबोटीच्या रॅम्पचे काम ठरल्याप्रमाणे पूर्ण झाले आहे. हा रॅम्प नदी परिवहन खात्याच्या ताब्यात दिला जाईल.

'या' तीन रस्त्यांसाठी स्वतंत्र निविदा
१८ जून, आत्माराम बोरकर व पिसुर्लेकर रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे करण्यात येणार आहेत. या कामाच्या स्वतंत्र निविदा सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जारी करण्यात येणार आहेत, असे पणजी स्मार्ट सीटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज म्हणाले.

हेही वाचा