एप्रिल, मेमध्ये पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षीच्या १ एप्रिलच्या तुलनेत यंदा सहापैकी साळावली, अंजुणे, चापोली, पंचवाडी आणि गावणे या पाच धरणांत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. आमठाणे धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे. गतवर्षी मान्सूनने विक्रमी हजेरी लावली होती. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी एप्रिल आणि मे महिन्यांत उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
जलस्रोत खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२४ रोजी साळावली धरणात ४९.६५ टक्के पाणीसाठा होता, तर १ एप्रिल २०२५ रोजी या धरणात ५८.७ टक्के पाणीसाठा आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी केवळ ४०.८४ टक्के पाणीसाठा होता, तर यावर्षी ४४ टक्के पाणीसाठा आहे. गावणे धरणात गतवर्षी ५७.१४ टक्के, तर यावर्षी ६६.३ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडीत गतवर्षी ३९.९१ टक्के, तर यावर्षी ४४.७ टक्के पाणीसाठा आहे.
आमठाणे धरणात सर्वांत कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी १ एप्रिल रोजी आमठाणेत ३८.२९ टक्के, तर यंदा ३१.६ टक्के पाणीसाठा आहे. उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी धरणाची क्षमता ४६ हजार २१७ हेक्टर मीटर असून १ एप्रिल २०२५ अखेरीस यामध्ये १७ हजार ७९३ हेक्टर मीटर (३८.५ टक्के) पाणीसाठा आहे.