दिवसाला ६ मद्यपी चालकांवर कारवाई; मागील पाच वर्षांत राज्यात १२३५ गंभीर अपघात
पणजी : गोवा पोलिसांनी मागील पाच वर्षांत दिवसाला सरासरी सहा मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. याशिवाय, पोलिसांनी दिवसाला सरासरी २९ चालकांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.
या कालावधीत राज्यात १२३५ गंभीर अपघात झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २०२० ते २०२४ दरम्यान ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ म्हणजेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १०,७७८ चालकांवर कारवाई केली आहे. याचा अर्थ, महिन्याला सरासरी १८० तर दिवसाला ६ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वरील कालावधीत २०२४ मध्ये सर्वाधिक ५३७० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. २०२३ मध्ये २०६०, २०२२ मध्ये १४२९, २०२१ मध्ये २९४ तर २०२० मध्ये १६२५ जणांवर कारवाई झाली.
वेगमर्यादा उल्लंघनामुळे गंभीर अपघात वाढत आहेत. त्यामुळे, पोलिसांनी २०२० ते २०२४ दरम्यान वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या (ओव्हर स्पीडिंग) ५२,१४८ जणांवर कारवाई केली आहे. यातून पोलिसांनी सुमारे ४.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०२४ मध्ये सर्वाधिक १८,०७८ चालकांकडून १.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. २०२३ मध्ये १३,४६१ चालकांकडून १.३६ कोटी रुपये, तर २०२२ मध्ये ९,२९४ चालकांकडून ८०.८४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.