नववी, दहावी वगळता अन्य विद्यार्थ्यांना शाळांतून मिळणार पुस्तके
शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी दाखल झालेली पाठ्यपुस्तके. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सयत्ता सहावीची मराठी आणि कोकणी पुस्तके वगळता अन्य सर्व सर्व इयत्तांची सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहे. सोमवारपासून वर्ग सुरू करण्यासाठी विद्यालये सज्ज झाली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी (एनईपी) शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे एनईपीनुसार वर्ग घेण्याला अडचण येणार नाही, अशी माहिती राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या (एससीईआरटी) संचालक मेघना शेटगावकार यांनी दिली.
यंदा सहावी आणि दहावी वर्गांना एनईपी लागू होईल. दहावीच्या पुस्तकांत बदल झालेला नाही. सहावीच्या पुस्तकांत मात्र बदल झाला आहे. इयत्ता नववीला मागील वर्षी एनईपी लागू झाली. यंदा सहावी, नववी आणि दहावीचे वर्ग एनईपीप्रमाणे सुरू राहतील. तीनच इयत्तांना एनईपी लागू असली तरी सहावी ते बारावीपर्यंतचे (अकरावी सोडून) वर्ग ७ एप्रिलपासून सुरू होतील. एप्रिलमध्ये सकाळी ११.३० पर्यंतच वर्ग चालतील. मे महिन्यातील सुट्टी संपल्यानंतर जूनपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू होतील.
पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके एससीईआरटीतर्फे मोफत दिली जातात. ही पुस्तके सर्व शाळांमध्ये पोहोचली आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याची जबाबदारी शाळांची असते. नववी आणि दहावीची पुस्तके शालान्त मंडळ तयार करते. ही पुस्तक बाजारातून विकत घ्यावी लागतात. पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. सहावीची मराठी आणि कोकणी पुस्तके जूनपर्यंत उपलब्ध होतील. एनईपीनुसार वेळापत्रक तयार करणे, अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण सहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे एनईपीच्या कार्यवाहीत कोणतीही अडचण येणार नाही, असे शेटगावकर यांनी सांगितले.