सदस्य सचिवपदाचा ताबा वरिष्ठ पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर यांच्याकडे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (पीसीबी) अध्यक्षपदाचा ताबा पर्यावरण सचिवांकडे, तर सदस्य सचिवपदाचा ताबा वरिष्ठ पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
पीसीबीच्या अध्यक्ष आणि सदस्य सचिवांचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपुष्टात आला. त्यानंतर दोन्ही पदांसाठी खात्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. अध्यक्षपदासाठी ९ अर्ज आले होते. त्यातून डॉ. लेव्हिन्सन मार्टिन्स यांच्या नावाची मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केली; पण त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे.
दरम्यान, सदस्य सचिवपदासाठी खात्याने गुरुवारी सलग चौथ्यांदा जाहिरात प्रसिद्ध केली असून, अर्ज करण्यासाठी ११ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत मंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा खात्याच्या सचिवांकडे, तर सदस्य सचिवपदाचा ताबा संजीव जोगळेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.