प्रकार बेकायदेशीर : संगीत कार्यक्रमांच्या परवानगींचा गैरवापर
पणजी : राज्यात खास करून दक्षिण गोव्यात म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धा, कराओके स्पर्धा अशा कार्यक्रम आयोजन केले जात आहेत. या ठिकाणी गर्दी गोळा करण्यासाठी हाऊझी किंवा तांबोला या खेळाचा वापर स्पर्धा आयोजक करतात. हा प्रकार बेकायदेशीर तसेच जुगाराचा असल्यामुळे तसेच हाऊसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी संगीत कार्यक्रमांच्या परवानग्यांचा गैरवापर केल्या जात असल्याचे लक्षात आल्यानंतर अशा कार्यक्रमावर बंदी घालण्याचा तसेच संबंधितावर कडक कारवाई करण्याचा आदेश जारी केला आहे. याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
दक्षिण गोव्यात म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धा, कराओके स्पर्धा अशा कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक ठिकाणी हाऊझी खेळ आयोजित केला जात आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. याच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहेत. तसेच आयोजक संबंधित उपजिल्हाधिकाऱ्याकडून संगीत कार्यक्रमांचे परवाने घेऊन हाऊझी आयोजित करत असल्याची माहिती देणाऱ्या तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केल्या. त्यात संगीत कार्यक्रमांच्या परवानगीचा गैरवापर करून हाउझी स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याची अनेक उदाहरणे नोंदवली गेली आहेत.
याची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी शुक्रवारी दक्षिण गोव्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. त्यात त्यांनी संगीत कार्यक्रमांना परवानगी देताना काही नियम अटी घालण्याची सूचना केल्या. तसेच त्या ठिकाणी मामलेदार किंवा तलाठ तैनात करण्यास सांगितले आहे. परवानगीचा अर्ज आल्यानंतर त्याची खातरजमा करण्यास सांगितले आहे. याशिवाय संगीत कार्यक्रमांचे किंवा इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ काढण्यास सांगितले. असे असताना त्या ठिकाणी हाऊझीचे किंवा इतर प्रकारचे जुगार होत असल्याचे नजरेस आल्यात पोलिसांना पाचारण करून असे प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
हाऊझीसाठी नागरिकांची गर्दी
म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धासाठी आयोजित हाऊझीसाठी हजारो लोक गर्दी करतात व एक हजार रुपयांना तीन तिकीटे अशी विक्री केली जाते. स्पर्धेच्या मध्यंतरांच्या कालावधीत अंक जाहीर करत स्पर्धा संपुष्टात आल्यावर तत्काळ बक्षिसांची रक्कम विजेत्यांच्या हातात मिळते. यातून नशीब आजमवणार्या लोकांची गर्दी दिसून येतात. रोख रकमेची बक्षिसे, स्पर्धेसाठी ठराविक परवानग्या व मोठ्या प्रमाणात मिळणारा परतावा यामुळे हाऊझीची क्रेझ आयोजकांना तसेच सहभागी नागरिकांना स्वस्त बसू देत नाही. ज्या ठिकाणी हाऊझी असेल त्याठिकाणी गर्दी होऊ लागल्याने या खेळातील लाखोंच्या बक्षिसांच्या रकमेवरील अर्थकारणाने लक्ष वेधून घेतलेले आहे.