मुख्यमंत्री : साखळीत भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात
भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
.....
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : फक्त साखळीच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातील बंधू-भगिनींचा मी विचार करतो. गरजू तरुणांना नोकरी मिळावी, हा माझा उद्देश आहे. येत्या दोन वर्षांत कर्मचारी भरती आयोगामार्फत थेट ५ हजारांहून अधिक नोकऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. पीडब्लूडी सोसायटी, जीएचआरडीसी आणि अन्य मार्गाने सुमारे दहा हजार पदे भरली जातील. असे एकूण १५ हजार सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
साखळी येथे शुक्रवारी आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, साखळी मंडळ समिती अध्यक्ष रामा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, उत्तर गोवा सदस्य स्वाती माईणकर, सुभाष मुळीक, महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, विविध पंचायतींचे सरपंच व इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. लहान-मोठ्या कामांचा पाठपुरावा करून लोकांना विविध सोयी व योजना मिळवून देण्यात भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर असतात. याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. हा कार्यकर्ता मेळावा म्हणजे विधानसभा निवडणुकीची पहिली जाहीर सभा आहे. निवडणुकीची जबाबदारी नवीन मंडळ समितीवर असून ती आजपासूनच सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
या मेळाव्यात इतरांचीही भाषणे झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन साखळी भाजप मंडळ समितीचे अभिनंदन करण्यात आले. मेळाव्यास मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
भिवपाची गरज ना : दामू नाईक
भाजपचा कार्यकर्ता केवळ देशाचा विचार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासारखी विचारधारा ठेवतो, असे सांगत ‘भिवपाची गरज ना’ म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केले.