खाणीच्या भाड्यातही दुपटीने वाढीची अधिसूचना
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खाण खात्याने गौण खनिज उत्खननाच्या रॉयल्टी (स्वामित्व) शुल्कात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. यानुसार चिरे, बेसॉल्ट, चुना, बांधकामासाठी वापरली जाणारी वाळू आणि दगड, विविध प्रकारची मुरूम, चिखल, डोलामाईट अशा विविध प्रकारच्या गौण खनिज उत्खननासाठीचे रॉयल्टी शुल्क वाढवण्यात आले आहे. खाणीच्या भाड्यातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. याबाबत खाण खात्यातर्फे नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लॅटराईट चिरे उत्खननासाठी पूर्वी प्रति घनमीटर ६६ रुपये शुल्क होते, ते वाढवून १३२ रुपये करण्यात आले आहे. बांधकामाच्या वाळूसाठी आधी ४१.३० रुपये प्रति घनमीटर शुल्क होते, ते वाढवून ८२.६० रुपये करण्यात आले आहे. चुन्याच्या खडकासाठीचे शुल्क ७५ वरून १५० रुपये प्रति घनमीटर करण्यात आले आहे. बेसॉल्टसाठीचे शुल्क ६२.४० रुपयांवरून १२४.८० रुपये प्रति घनमीटर करण्यात आले आहे. बोल्डर खडकासाठीचे शुल्क ९.६० रुपयांवरून १९.२० रुपये प्रति घनमीटर करण्यात आले आहे. मुरूमचे शुल्क १२ रुपयांवरून २४ रुपये केले आहे.
मुरूम, मातीसाठी २० हजार रुपये वार्षिक भाडे
टाईल बनवण्यासाठीच्या मातीचे शुल्क १५ रुपयांवरून ३० रुपये प्रति घनमीटर केले आहे. वीट बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या उत्खननासाठीचे रॉयल्टी शुल्क १५ रुपयांवरून ३० रुपये प्रति घनमीटर केले आहे. डोलोमाईट या गौण खनिजासाठीचे शुल्क १५० रुपये प्रति टन करण्यात आले आहे. तर कॅल्शियम बेंटोनेटचे शुल्क ३० रुपये प्रति घनमीटर इतके ठरवण्यात आले आहे. खात्याने वाळू, लॅटराईट चिऱ्याच्या ५ हेक्टरपर्यंतच्या खाणीसाठी ४० हजार, बेसॉल्ट, ग्रॅनाईटसाठी ६० हजार, तर मुरूम, मातीसाठी २० हजार रुपये वार्षिक भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.