मुख्यमंत्र्यांचा इशारा : शेगड्या, स्टोव्ह सीमेवरच करणार जप्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पर्यटकांकडून किनारी भाग किंवा रस्त्यांच्या कडेला जेवण बनवण्याचे प्रकार यापुढे पूर्णपणे बंद केले जातील. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासह त्यांच्याकडील शेगडी, स्टोव्ह आणि स्वयंपाकासंदर्भातील इतर साहित्य सीमांवरच जप्त केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
राज्यात येणारे काही पर्यटक किनारी भाग तसेच रस्त्यांच्या कडेला जेवण बनवत आहेत. त्यामुळे अशा भागांत कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले असून, त्याबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारीही येत आहेत. यापुढे राज्यात येणाऱ्या पर्यटकांचे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. गोव्यात येऊन त्यांनी किनारी भाग तसेच रस्त्यांकडेला जेवण बनवू नये, यासाठी त्यांच्याकडील शेगड्या, स्टोव्ह आणि स्वयंपाक बनवण्यासंदर्भातील इतर साहित्यही सीमेवरच जप्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
पर्यटकांनी गोव्यात आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी. उघड्यावर जेवण बनवू नये किंवा वाहने उभी करून जेवणही करू नये. तसेच प्रकार निदर्शनास आल्यास अशा पर्यटकांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश आपण शुक्रवारी पोलिसांसोबत घेतलेल्या बैठकीत दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टाऊट्स, भिकाऱ्यांवरही होणार कडक कारवाई
टाऊट्स तसेच भिकाऱ्यांचे प्रमाणही राज्यात वाढत आहे. त्यांच्याकडून पर्यटकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा टाऊट्स आणि भिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल. यापुढे त्यांच्याकडून केवळ दंड वसूल करून त्यांना सोडण्यात येणार नाही. त्यांना थेट तुरुंगात टाकले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.