राज्यपाल गोव्याबाहेर; मंत्रिमंडळ फेरबदल पुढील आठवड्यात शक्य

मुख्यमंत्र्यांचा पुन्हा दिल्ली दौरा शक्य : मगोबाबतच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष


43 mins ago
राज्यपाल गोव्याबाहेर; मंत्रिमंडळ फेरबदल पुढील आठवड्यात शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सोमवारपर्यंत गोव्याबाहेर असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक मगोसोबतची युती आणि फेरबदलाबाबतच्या पुढील चर्चेसाठी दिल्ली दौरा करणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलासंदर्भात भाजप आणि सरकारमध्ये अंतर्गतरीत्या सुरू असलेल्या हालचालींमुळे याच आठवड्यात फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गुरुवारी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने दोन दिवसांत नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती; परंतु राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई शुक्रवारी रात्री केरळला रवाना झालेले आहेत. सोमवारी दुपारी ते गोव्यात परतणार आहेत. त्यामुळे राज्यपाल गोव्यात परतल्यानंतर पुढील आठवड्यातच मंत्रिमंडळ फेरबदल करून नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याच आठवड्यात प्रियोळमधील कार्यक्रमात बोलताना सत्तेत असलेल्या मगो पक्षाला डिवचले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघ भाजपकडेच असेल. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी आताच चालते व्हावे, असेही त्यांनी नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांमुळे बळ संचारलेल्या मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी नंतरचे दोन दिवस ढवळीकर बंधूंवर टीका आणि आरोपांच्या फैरी सुरू केल्या. भाजपला मगोपची गरज नसल्याचे सांगत, फोंडा तालुक्यांतील चारही मतदारसंघांची जबाबदारी पक्षाने आपल्यावर दिल्यास आपण चारही ठिकाणी पक्षाला यश मिळवून देऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री आणि गोविंद गावडे यांच्या या वक्तव्यांमुळे बिथरलेल्या ढवळीकर बंधूंनी थेट दिल्ली गाठून तेथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन युती टिकवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचीही गुरुवारी भाजप कार्यालयात भेट घेत, युती कायम ठेवण्याबाबत चर्चा केली होती.
मगोचा विषय निपटूनच फेरबदल
राज्यात भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पुढील दोन वर्षे सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आताच मगोला सरकारातून बाहेर काढून त्यांच्याकडे असलेले एक मंत्रिपद आणि महामंडळ भाजप आमदारांना द्यावे. त्याचा फायदा पुढील निवडणुकांत भाजपलाच मिळेल, अशी मागणी कोअर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांकडूनही वाढत आहे.
कोअर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. किंबहूना त्याच अनुषंगाने गेल्या काही महिन्यांत त्यांनी वक्तव्येही केलेली आहेत. त्यामुळे पुढील दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकांत प्रथम मगोला सत्तेतून हटवण्याबाबत निर्णय होईल आणि त्यानंतरच कोणाला वगळून कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावायची​ याचा निर्णय घेण्यात येईल, असे भाजपातील सूत्रांनी सांगितले.
विद्यमान मंत्रिमंडळातील बारापैकी चार मंत्री फोंडा तालुक्यातील आहेत. त्यातील एका मंत्र्याला हटवण्याचा विचार याआधीच मुख्यमंत्र्यांनी सुरू केला होता. त्यात आता युतीचे प्रकरण तापलेले असल्याने हीच संधी साधून सुदिन ढवळीकर यांचे मंत्रिपद काढून घेऊन मुख्यमंत्री ते भाजप आमदाराला देऊ शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.