कळंगुटनंतर आता ताळगाव ‘शहरी भाग’

भू महसूल नियमाखाली अधिसूचना जारी


7 hours ago
कळंगुटनंतर आता ताळगाव ‘शहरी भाग’

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भू महसूल नियमाखाली (लँड रिव्हेन्यू कोड) ताळगाव पंचायतीचा भाग ‘शहरी भाग’ म्हणून जाहीर झाला आहे. या विषयीची अधिसूचना महसूल खात्याने जारी केली आहे. यापूर्वी कळंगुट पंचायत भाग भू महसूल नियमाखाली ‘शहरी भाग’ म्हणून जाहीर झाला आहे.
जमनीसंबंधीच्या नियमांसाठी ताळगावचा ‘शहर’ म्हणून उल्लेख होईल. घरपट्टी तसेच अन्य शुल्क पंचायतीप्रमाणे लागू होतील. त्यामुळे नागरिकांना कोणताच फटका बसणार नाही. शहरी भागासाठी केंद्राच्या विविध योजना असतात. या योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. मनरेगा योजनेखाली शहरी भागासाठी अधिक निधी मिळतो. हा निधी ताळगावला मिळणार आहे. तसेच सीआरझेड कायद्याखाली ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी वेगळी तरतूद असते. बांधकामांसाठी एफएआर तसेच इमारतींचे अधिक मजले बांधण्याची सवलत मिळेल, अशी माहिती महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी ताळगाव पंचायतीने शहरी भागात समावेश करण्याबाबतचा ठराव संमत केला होता. हा ठराव सरकारला पाठवण्यात आला होता. ताळगाव पंचायतीच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. भू महसूल कायद्यानुसार शहरी भागात समावेश करण्याची आणखी काही गावांची मागणी आहे. अभ्यास करून गावाप्रमाणे निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कळंगुट हा किनारी भाग आहे. त्याला सीआरझेड कायदा बऱ्याच भागाला लागतो. शहरी भागात समावेश झाल्याने बांधकामांसाठी बऱ्याच सवलती कळंगुटवासीयांना मिळाल्या आहेत.