प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांच्या भेटीसाठी दीपक ढवळीकरांची धाव

भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रथमच घेतली भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 12:15 am
प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांच्या भेटीसाठी दीपक ढवळीकरांची धाव

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतल्यानंतर मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले की, मगो-भाजप युती मजबूत आहे. निवडणुकीस अजून दोन वर्षे असल्याने सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत नाही. मात्र, निवडणुकीच्या वेळी यावर चर्चा होईल, असे दोन्ही पक्षाध्यक्षांनी सांगितले.   

  

दीपक ढवळीकर यांनी भाजप कार्यालयाला प्रथमच भेट देऊन दामू नाईक यांच्याशी चर्चा केली. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. बैठकीत राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.      

मगो आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने आमची युती कायम आहे. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात २०१२ ते २०१७ दरम्यानही ही युती होती आणि ती पुढेही टिकेल. विधानसभा निवडणुकीस अजून दोन वर्षे असल्याने सध्या जागावाटपाचा कोणताही विषय नाही. योग्य वेळी यावर निर्णय घेतला जाईल, असे मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.     

मगोचे सध्या दोन आमदार आहेत. सुदिन ढवळीकर सरकारमध्ये मंत्री असून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मगोच्या दोन्ही आमदारांकडे पदे असली, तरी भाजपच्या अनेक आमदारांकडे कोणतेही पद नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी फक्त आलेक्स सिक्वेरांनाच मंत्रिपद मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री मायकल लोबो यांच्याकडे कोणतेही पद नाही.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या प्रक्रियेत मगोचे मंत्रिपद काढण्याचा पर्याय विचाराधीन होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिपद जाण्याच्या शक्यतेने मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी थेट दिल्लीत जाऊन भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. युती टिकल्यास मगोचे मंत्रिपद कायम राहणार आहे. भाजपकडे संख्याबळ असल्याने त्यांना मगोची गरज नाही, मात्र पक्ष टिकवण्यासाठी मगोला मंत्रिपद आवश्यक आहे. त्यामुळे युती टिकवण्याचा आटापिटा मगोने सुरू केला आहे.