‘गोवन वार्ता’च्या बातमीनंतर विद्यापीठाकडून निर्णय मागे
पणजी : गोवा विद्यापीठाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षात विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशात बाहेरील विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीचा कोटा जवळपास दुप्पट केला होता. याबाबत ‘दै. गोवन वार्ता’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर विद्यापीठाने हा निर्णय त्वरित मागे घेतला.
यामुळे ४ आणि ५ एप्रिलला होणाऱ्या प्रवेश फेरीसाठी मागील वर्षीप्रमाणे बाहेरील विद्यापीठातील केवळ दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
नवीन नियमानुसार जीयूएआरटी २०२५-२६ मध्ये अभ्यासक्रमांनुसार १ ते १० जागा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यंदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण ११३३ जागांपैकी ११२ जागा बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. तसेच, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये एकूण १०४६ पैकी १०५ जागा बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या निर्णयाला विरोध झाल्याने बाहेरील विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच्या जागा पुन्हा कमाल दोन करण्यात आल्या आहेत.