एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात समविचारी एकवटले
मडगाव येथील लोहिया मैदानावर जाहीर सभेत बोलताना विद्यार्थी.
मडगाव : शाळांमध्ये आवश्यक साधनसुविधांच्या सोयीविना एप्रिल महिन्यात शाळा सुरू करणे चुकीचे आहे. राज्य सरकार पालकांचे म्हणणे ऐकून घेत नाही. शिक्षण खात्याच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात दाद मागणार, अशी माहिती सिसिल रॉड्रिग्ज यांनी दिली.
मडगाव येथील लोहिया मैदानावर रविवारी सायंकाळी एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात समविचारी एकत्र आले. त्याठिकाणी जाहीर सभेत पालकांसह विद्यार्थ्यांकडून या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार विजय सरदेसाई, साविओ कुतिन्हो, प्रतिमा कुतिन्हो, सिसिल रॉड्रिग्ज व इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार असल्याचे मत मांडण्यात आले. या कार्यक्रमानंतर सिसिल रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, राज्य सरकारने एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला राज्यभरातील पालकांचा विरोध होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्यामुळे मुलांना उन्हाचा त्रास होणार आहे. याशिवाय नव्या अभ्यासक्रमानुसार ज्या साधनसुविधा शाळांमध्ये असाव्यात त्या अजूनही उपलब्ध नाहीत. पूर्वतयारीशिवाय कोणताही निर्णय घेणे हे मुलांच्या शैक्षणिक विकासात अडथळा ठरणारे आहे.
एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यासाठी पालकांचा विरोध असतानाही राज्य सरकार पालकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेविरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेण्यात येईल. न्यायालयाकडून दिलेल्या निर्णय पाहता शिक्षण खात्याकडून काढण्यात आलेला निर्णय मान्य नसल्यास पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना आहे. त्यानुसार पालकांकडून न्यायालयात अधिसूचनेविरोधात धाव घेण्यात येणार आहे.
‘या’ बाबींचा विचार होणे आवश्यक
- विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होणार असून काही मुले चालत येतात, तर काही बसने येतात त्यांच्या आरोग्याची काळजीही करण्याची गरज आहे.
- सकाळी मुलांना शाळेत सोडल्यानंतर पालकांना ११.३० वा. आपले काम बाजूला ठेवून पुन्हा मुलांना शाळेतून आणण्यासाठी यावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार होण्याची गरज आहे.