वर्षाला सरासरी ९९ हजार रुग्णांनी घेतला योजनेचा लाभ
पणजी : राज्य सरकारने सुरू केलेल्या दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेतून (डीडीएसएसवाय) सहा वर्षांत २८०.३७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याचाच अर्थ या योजनेवर वर्षाला सरासरी ४६.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०१९ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान ९९ हजार १५८ म्हणजेच वर्षाला सरासरी १६ हजार ५२६ रुग्णांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. आर्थिक सर्व्हेक्षण २०२४-२५ मधून ही माहिती मिळाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, राज्याच्या विकासात सार्वजनिक आरोग्य हे महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी शासनाने राज्यात चांगली, सर्वसमावेशक आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. यासाठी सरकारने डीडीएसएसवाय आरोग्य विमा योजना सुरू केली होती. ३१ जानेवारी २०२५ अंतर्गत राज्यात १ लाख ८३ हजार ६९८ सक्रिय कार्ड बनवण्यात आली आहेत. मागील सहा वर्षांत २०२३-२४ मध्ये सर्वाधिक २१ हजार ६७० रुग्णांनी या योजनेचा फायदा घेतला. यासाठी ७३.६४ कोटी रुपये खर्च आला होता.
वर्षनिहाय पाहता २०१९-२० मध्ये ८,५८३ रुग्णांनी या योजेअंतर्गत उपचार केले होते. यासाठी ३६.५७ कोटी रुपये खर्च आला होता. २०२०-२१ मध्ये १७ हजार ९८३ रुग्णांवर ४३.४४ कोटी, २०२१-२२ मध्ये १० हजार ६८७ रुग्णांवर ५३.३१ कोटी, २०२२-२३ मध्ये २० हजार ९५४ रुग्णांवर ४०.५६ कोटी तर २०२४-२५ मध्ये (३१ जानेवारी अखेरीस) १० हजार २८१ रुग्णांवर ३२.८५ कोटी रुपये खर्च करण्यात आलल्याचे अहवालात म्हटले आहे.
पीएमजेएवाय अंतर्गत ९ हजार दावे निकाली
राज्यात सहा वर्षांत केंद्र सरकारच्या पीएमजेएवाय योजनेअंतर्गत ९ हजार ६२८ आरोग्य विमा दावे निकाली काढण्यात आले आहेत. यावर सुमारे ४.७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेस राज्यात ३६ हजार ९७० कुटुंब पात्र असल्याचे अहवालात म्हटले आहे.