पन्नास पेक्षा अधिक लोकांनी केलेल्या हल्ल्यात सहा पेक्षा अधिक जण जखमी
पणजी : खानापूर तालुक्यातील शाहूनगर विद्यानगर परिसरात जमिनीच्या तंट्यातून दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून, या घटनेदरम्यान ६ पेक्षा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येथे कार्यरत असलेल्या सिरॅमिक कारखान्याच्या प्लॉट क्रमांक १३८ बाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गेल्या पाच दिवसांपासून कारखान्याचे कर्मचारी जमीन स्वच्छ करत होते. याच दरम्यान, काही लोकांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
अन्य एका माहितीनुसार खानापूरच्या विद्यानगरमधील संदीप पाटील आणि परशुराम अंकुश पाटील या दोघांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने बेळगावच्या बीएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान हे कामगार आपल्या कामात गुंतलेले असताना अचानक ५० पेक्षा अधिक लोकांचा जमाव एकत्र आला आणि त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी क्रिकेट बॅट, लाठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. ही घटना खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासचक्रे गतिमान केली आहेत.