वीज आल्याने रहिवाशांमध्ये समाधान
फोंडा : गेली कित्येक वर्षे अंधारात राहणाऱ्या फोंडा निरंकाल गवळीवाडा येथील वानारमारे या अनुसूचित जमातीच्या झोपड्यांपर्यंत अखेर वीज पोहोचली आहे. अनेक दशके अंधारात जगणाऱ्या कातकरी समाजातल्या लोकांच्या चेहऱ्यावर अखेर हास्य फुलले.
वीज खात्याने एकूण २० झोपड्यांना भूमिगत जोडणीद्वारे वीजपुरवठा केला आहे. या उद्घाटन समारंभाला वीज विभागाचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकर, सहाय्यक अभियंता निलकंठ सावंत, कर्मचारी तसेच एनजीओ सेन्सेशन सेंटरचे बाबानी मापारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मूळचे महाराष्ट्रातील असणारे कातकरी समाजातील हे लोक मूलभूत सुविधांअभावी कठीणप्रद जीवन जगत होते. मात्र वीज खात्यामुळे या रहिवाशांच्या आशा उंचावल्या असून झोपड्यांमध्ये वीज आल्याने समाजातील मुले शिकून त्यांची परिस्थिती सुधारेल अशी इच्छा समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे. झोपड्यांमध्ये वीज आल्यानंतर कातकरी समाजातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
काही वर्षांपूर्वी, अज्ञात व्यक्तींनी झोपड्या पाडल्यानंतर, या लोकांचे हलाखीचे जीवन समाजासमोर आले होते. त्यानंतर मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत सरकारला मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. यात गोव्यातील लोकांनीही आपापल्यापरीने शक्य तितकी मदत केली होती. आता या समाजातील लोकांना काँक्रिटचे घर बांधणयाची इच्छा आहे, मात्र त्यांना जमिनीच्या मालकीचा अधिकार नसल्याची बाब समोर आली आहे.
सहा महिन्यांपासून वीज जोडणीची प्रक्रिया सुरू
या कुटुंबांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया वीज विभागाने सहा महिन्यांपूर्वी सुरू केली होती. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या प्रयत्नांमुळे या कामाला चालना मिळाली. भूमिगत वीज जोडण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, प्रत्येक झोपडीत सुमारे दोन मीटर उंच भिंत उभारून त्यावर वीज मीटर, स्विच बोर्ड आणि बल्ब लावण्याची व्यवस्था केली आहे.
झोपड्यांमध्ये वीज आल्याने जीवन बदलणार : पवार
"आमच्या झोपड्यांमध्ये वीज असावी हे आमचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले आहे. पूर्वी वस्तीबाहेर विजेचे खांब होते, पण झोपड्यांमध्ये अंधारच होता. आता वीज आल्याने आमची मुले अभ्यास करू शकतील. या कामाला पाठिंबा देणाऱ्या गोवा सरकार, वीज विभाग आणि सामाजिक संस्थांचे समाज मनापासून आभार मानू इच्छितो'', असे येथील रहिवासी गोपाळ पवार म्हणाले.