पणजी : राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह एक मंत्रीही दिल्लीत दाखल झालेला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने या सर्वांच्या केंद्रीय नेत्यांशी पुन्हा बैठका होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली दौरा करून मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि दामू नाईक दोघेही दिल्लीला गेले होते. या दोघांनाही पुन्हा मंगळवारी दिल्लीत बोलावण्यात आले होते. पण, त्याआधीच हे दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या प्रक्रियेला गती आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी प्रुडंट वृत्तवाहिनीवरील 'हेडऑन' कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येईल. एका-दोघा मंत्र्यांना डावलण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेचच ते दिल्लीत दाखल झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदल कोणत्याही क्षणी होऊ शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.