पणजी गट काँग्रेसचे स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन
स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्ज यांना निवेदन देताना प्रतिभा बोरकर. सोबत इतर.
पणजी : ३१ मार्चपूर्वी काम पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या स्मार्ट सिटीने ते सिद्ध करून या विषयावरील श्वेतपत्रिका सादर करावी. पूर्ण झालेल्या कामांचे फोटो लावले जातात. मात्र, प्रत्यक्षात सदर कामे अर्धवट झालेली आहेत, असा आरोप पणजी गट काँग्रेसने केला आहे. ३१ मार्चची अंतिम मुदत असूनही पणजी गट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पणजी स्मार्ट सिटीच्या कचेरी बाहेर या कामाचा निषेध करत स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्ज यांना निवेदन दिले.
पणजी काँग्रेस गटाच्या अध्यक्षा प्रतिभा बोरकर यांनी निवेदन सादर केल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामाविषयी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. श्वेतपत्रिकेत पूर्ण झालेल्या आणि प्रलंबित कामांचा तपशील तसेच यासाठी झालेला खर्चासह या कामासाठी कंत्राटदारांवर केलेली कारवाई, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची माहिती तसेच सदर कामे कधी पूर्ण होणार या हमीसह तारीख द्यावी, अन्यथा जनता आणि न्यायालय त्यांना जबाबदार धरतील, असेही बोरकर यांनी सांगितले.दरम्यान, पावसाळा जवळ येत असून या कामासाठी बराच विलंब होत आहे. या कामाच्या अव्यवस्थित नियोजनाचा वाहन चालकांसह स्थानिकांनाही नाहक त्रास होत आहे. सरकार आणि स्मार्ट सिटी व्यवस्थापन विकासाच्या नावाखाली फक्त लोकांचे पैसे हडप करत आहे. त्यांना सामान्य लोकांशी काहीही देणेघेणे नाही, असा आरोप बोरकर यांनी केला.
राज्यातील सर्व स्मार्ट सिटी प्रकल्पांची स्वतंत्र चौकशी करण्याचा आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक आणि भ्रष्टाचार उघड करण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरात लवकर पारदर्शक कारवाई न केल्यास आम्ही लोकांसह रस्त्यावर उतरू आणि हे प्रकरण न्यायालयात नेवू. - प्रतिभा बोरकर अध्यक्ष, पणजी काँग्रेस गट समिती