पणजी : २०१९ ते २०२३ या पाच वर्षात दक्षता संचालनालयाने ९६ तक्रारी निकालात काढतानाच एकूण १५ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 2023 वर्षअखेर दक्षता संचालनालयाकडे ७३ तक्रारी प्रलंबित होत्या, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.
२०१९ ते २०२१ या तीन वर्षात तक्रारी निकालात काढण्याबरोबर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाणही जास्त होते. मात्र २०२२ व २०२३ वर्षात तक्रारी निकालात काढण्याबरोबर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाणही कमी झाले, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दक्षता संचालनालयाने २०१९मध्ये ३८, २०२०मध्ये १७ तर २०२१मध्ये २८ तक्रारी निकालात काढल्या होत्या. २०२२मध्ये फक्त ५ तर २०२३मध्ये ८ तक्रारी दक्षता संचालनालयाने निकालात काढल्या. आरोपपत्र दाखल करण्याचा विचार केला तर २०१९ ते २०२१पर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण अधिक होते. २०२२ व २०२३ या दोन वर्षात ते कमी आहे. २०१९ वर्षात ३८, २०२० वर्षात १७ तर २०२१ वर्षात २८ तक्रारीत दक्षता संचालनालयाने आरोपपत्रे दाखल केली. याउलट २०२२मध्ये ५ तर २०२३मध्ये केवळ ८ तक्रारीप्रकरणी आरोपपत्रे दाखल केली.
२०१९ ते २०२३पर्यंत १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. २०२२मध्ये तब्बल १० अधिकाऱ्यांना निलंबित केलेले आहे. २०१९ मध्ये २ तर २०२०, २०२१ व २०२३ या तीन वर्षात दरेकी एक अधिकारी निलंबित झालेला आहे. दक्षता संचालनालयाकडे नवीन तक्रारी येण्याची संख्याही कमी झाली आहे. पूर्वीच्या तक्रारी प्रलंबित असल्याने वर्षअखेर प्रलंबित तक्रारींचा आकडा वाढत आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आहे.