मंत्रिमंडळ फेरबदल; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मंत्री अस्वस्थ

मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित


31st March, 12:25 am
मंत्रिमंडळ फेरबदल; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मंत्री अस्वस्थ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय पक्ष घेईल. त्यात एका-दोघांना डावलण्यात येईल, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच श​निवारी प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केल्याने मंत्रिमंडळात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे डावलण्यात येणारे मंत्री कोण, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा गेल्या काही म​हिन्यांपासून सुरू आहे. सभापती रमेश तवडकर यांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य, त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशी घेतलेल्या बैठका आणि आता येत्या मंगळवारी मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांचा असलेला दिल्ली दौरा यामुळे पुढील काहीच दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत पक्षांतर्गत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे काही मंत्र्यांमध्येही अस्वस्थता पसरली असून, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत.
विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने आखलेल्या रणनीतीनुसार एका-दोघा मंत्र्यांना वगळण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले असले, तरी सद्यस्थितीत तीन मंत्र्यांचा पत्ता कट करण्याचे नियोजन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केले आहे. त्यांच्याऐवजी मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याचाही निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
मंगळवारचा दिल्ली दौरा महत्त्वाचा
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने पुढील चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक येत्या मंगळवारी दिल्लीला जाणार आहेत. त्यावेळी वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या बैठकीत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.