मंत्री राणे : २०२२-२३ नंतर लाभार्थ्यांच्या संख्येत घट
पणजी : गर्भवती आणि बाळंतिणीसाठी महिला आणि बाल विकास खात्याच्या तीन योजना आहेत. गेल्या चार वर्षांत ५२ हजारांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २०२२-२३ मध्ये या योजनेचा जास्तीत जास्त २३ हजार महिलांनी लाभ झाला होता. मात्र, त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
विधानसभेत लेखी उत्तरात मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, गर्भवती आणि बाळंत महिलांसाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि ममता योजना राबविण्यात येत आहेत. या तिन्ही योजनांसाठी २०२२-२३ ते २०२४-२५ पर्यंत ५२,५१० पात्र महिलांनी लाभ घेतला आहे. २०२२-२३ मध्ये २३,६४० महिलांनी, २०२३-२४ मध्ये १३,०३३ महिलांनी आणि २०२४-२५ मध्ये १५,८३७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत, गर्भवती आणि स्तनदा महिलांना पौष्टिक अन्न आणि धान्य मिळते. गेल्या चार वर्षांत २७,९७२ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
२०२२-२३ मध्ये ११,३१४ महिलांनी, २०२३-२४ मध्ये ९,१०३ आणि २०२४-२५ मध्ये ७,५५५ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. खात्याच्या ममता योजनेअंतर्गत, मुलगी जन्माला आल्यानंतर राज्य सरकार गर्भवती आईला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. गेल्या चार वर्षांत एकूण १०,९१९ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २०२२-२३ मध्ये ४,५३९ महिलांनी, २०२३-२४ मध्ये २,५५१ आणि २०२४-२५ मध्ये ३,८२९ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
‘मातृ वंदना’चा ४ वर्षांत १० हजार महिलांना लाभ
पंतप्रधान मातृ वंदना योजनेअंतर्गत गरजू महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. गेल्या चार वर्षांत एकूण १०,३७१ महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. २०२२-२३ मध्ये ४,५३९ महिलांनी, २०२३-२४ मध्ये १,३७९ आणि २०२४-२५ मध्ये ४,४५३ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.