काही मुलांना सोपवले त्यांच्या कुटुंबियांकडे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील चार वर्षांत भीक मागणाऱ्या ७५ लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. काही मुलांची रवानगी ‘अपना घरा’त, तर काही जणांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. २०२४ मध्ये सर्वाधिक ४० मुलांची सुटका करण्यात आली, अशी माहिती महिला आणि बाल कल्याणमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
मंत्री राणे उत्तरात पुढे म्हणतात, भीक मागणाऱ्या मुलांची सुटका केल्यानंतर त्यांची जिल्हा इस्पितळात आरोग्य तपासणी केली जाते. बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर त्यांना ‘अपना घरा’त पाठवले जाते. ओळख पटल्यानंतर काही मुलांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले जाते. अशा मुलांचे पुनर्वसन व्हावे यासाठी बाल कल्याण समिती त्यांना त्या गावातील बाल कल्याण समितीकडे सोपवले जाते.
२०२१ साली ५, २०२२ साली २१, २०२३ साली ९, तर २०२४ साली सर्वाधिक ४० भीक माकणाऱ्या मुलांची सुटका करण्यातअ आली आहे, अशी माहितीही मंत्री राणे यांनी उत्तरातून दिली आहे.