सध्याचा मगो भाऊसाहेबांचा पक्ष नाही : गोविंद गावडे

बहुजन नेत्याला अध्यक्ष करण्याचे आवाहन : दीपक ढवळीकरांकडून प्रत्युत्तर


31st March, 11:46 pm
सध्याचा मगो भाऊसाहेबांचा पक्ष नाही : गोविंद गावडे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सध्याचा मगो पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे. तो भाऊसाहेबांचा पक्ष उरलेला नाही. आताचा पक्ष भाऊसाहेबांचाच आहे, हे दाखवून द्यायचे असेल तर जीत आरोलकर किंवा अन्य बहुजन नेत्याला पक्षाचे अध्यक्ष करावे. भाजपला सध्याच्या मगोपसोबत युती करण्याची गरज नाही. भाजपने आदेश दिल्यास फोंडा तालुक्यातील सर्व मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले. सोमवारी पणजीत त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
मंत्री गावडे पुढे म्हणाले की, भाऊसाहेबांचा मगो पक्ष आणि आताचा मगो वेगळा आहे. मगोपमधून अनेक बहुजन नेते बाहेर पडले आहेत. काशिनाथ जल्मी, स्व. लवू मामलेदार, नरेश सावळ, बाबू आजगावकर, दीपक पावसकर यासारख्या नेत्यांनी मगोपसाठी सर्वस्व वाहिले होते. तरीदेखील त्यांना पक्ष सोडावासा का वाटला याचा विचार झाला पाहिजे. भाऊसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष गोव्यातील बहुजन समाजाचा, तळागाळातील जनतेचा पक्ष होता. सध्याचा पक्ष माधवरावांच्या गोठ्यातील पक्ष झाला आहे.
ते म्हणाले, माझ्या वडिलांनी, मी पूर्वी मगो पक्षासाठी काम केले होते. आता जे मोठ्या तोंडाने सांगत आहेत, ते पूर्वी ‘काँग्रेसचे एजंट’ म्हणून काम करत होते. १९९९ मध्ये हेच लोक काँग्रेसला मत द्या म्हणून प्रचार करत होते. मगोतील बैल आणि म्हशींनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी विचार करावा. कारण आज जे बोलत आहेत, त्यांचा राजकारणातील ‘श्री गणेशा’ मी करून दिला आहे. १९९९ मध्ये मी, विनोद नागेशकर, स्व. शिवदास वेरेकर यांनी प्रयत्न केल्यानेच यांना तिकीट मिळाले होते. २०१२ पासूनच या पक्षासोबत युती करू नये, असे माझे पक्के मत आहे.
मगो कुटुंबापुरता मर्यादित राहिल्याने वाढला नाही !
मगो पक्षाला वाढवायचा असता तर ते काम याआधीच झाले असते. मात्र पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित असल्याने हे शक्य झालेले नाही. स्व. लवू मामलेदार फोंड्यातून निवडून आले होते, तेव्हाही मंत्रिपद यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला मिळाले होते. सध्या या लोकांना केवळ टक्केवारी आणि कमिशन हवे आहे. त्यांना पक्षाच्या भल्या-बुऱ्याचा फरक पडत नाही. याआधी मी शिरोडा, प्रियोळ, फोंडा मतदारसंघांत काम करून दाखवले आहे. पूर्वी मी मडकईमध्ये निवडणूक लढवली होती. तिथे आजही माझे कार्यकर्ते आहेत, असेही मंत्री गोविंद गावडे म्हणाले.


मगोचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार : आरोलकर
मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. ढवळीकर बंधूंविषयी माझ्या मनात आदरच आहे. त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझ्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार केल्यात मी ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया मांद्रेचे मगोपचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.


नैराश्येतूनच गावडेंचे वैयक्तिक आरोप : ढवळीकर
गत विधानसभा ​निवडणुकीत मंत्री गो​विंद गावडे प्रियोळ मतदारसंघात काठावर पास झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची खात्री नसल्यामुळेच ते निराश झाले आहेत. त्यामुळेच ते आमच्यावर वैयक्तिक आरोपबाजी करत आहेत, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले. पक्षाच्या घटनेनुसार पात्र असलेली कोणीही व्यक्ती मगोची अध्यक्ष होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.