७६२ गुन्हे, ८९५ गजाआड; ४६ आरोपींना शिक्षा, तर ५ जण पुराव्याअभावी निर्दोष
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकासह (एएनसी) राज्यातील पोलिसांनी ७६२ गुन्हे दाखल करून ८९५ जणांना अटक केली आहे. त्यात सर्वाधिक २८.२६ टक्के, म्हणजे २५३ गोमंतकीयांचा समावेश आहे. ६.०३ टक्के म्हणजे ४६ गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी याविषयी अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता. गोवा पोलिसांच्या विविध पोलीस विभागांनी अमलीपदार्थ विरोधी कारवाई करून ७६२ गुन्हे दाखल करून ८९५ जणांना अटक केली आहे. त्यातील सर्वाधिक २५३ (२८.२६ टक्के) गोमंतकीय आहेत. ५०५ (५६.४२ टक्के) परप्रांतीय, तर फक्त १३७ (१५.३० टक्के) विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
गोवा पोलिसांनी २०२० मध्ये १४८, २०२१ मध्ये १२१, २०२२ मध्ये १५४, २०२३ मध्ये १४०, २०२४ मध्ये १६२, तर १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ३७ गुन्हे दाखल केले आहेत. यातील ४६ (६.०३ टक्के) आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ५ गुन्ह्यांतील संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. ५६५ गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. १३४ गुन्ह्यांचा तपास गोवा पोलीस करत आहेत. दोन गुन्हे केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाकडे वर्ग केले आहे. २ गुन्ह्यांतील संशयितांचा मृत्यू झाल्यामुळे खटला निकालात काढला, तर संशयितांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे नसल्यामुळे ३ गुन्ह्यांतील संशयितांना आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. पाच गुन्ह्यांतील संशयित सापडले नाहीत किंवा इतर कारणांमुळे न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे, अशी माहिती लेखी उत्तरातून मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.