‘डिजिटल अरेस्ट’ आणि आर्थिक आमिषांच्या माध्यमातून केली जाणारी डिजिटल आर्थिक फसवणूक हे सध्याचे मोठे आव्हान आहे. असे प्रकार टाळण्यासाठी सायबर साक्षरता आणि मार्गदर्शनाची गरज आहे. पोलिसांनी असे गुन्हे घडल्यानंतर तक्रारी दाखल करून तपास करण्यात वेळ वाया न घालवता असे गुन्हे टाळण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम हाती घ्यायला हवा. सरकारने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यायला हवे.
कमी काळात पैसे दुप्पट करण्याचा हव्यास किंवा सायबर साक्षरते अभावी आर्थिक फसवणूक होते. अलीकडच्या काळात अशा प्रकारांना शेकडो ज्येष्ठ नागरिक बळी पडले आहेत. त्यात ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार धोकादायक ठरला आहे. परवाच बेळगावातील खानापूर तालुक्यातील बिडी येथे एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. हा प्रकार ‘डिजिटल अरेस्ट’च्या गुन्ह्यातून घडल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्ह्याच्या या अद्ययावत प्रकाराला प्रत्येकाने, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अलीकडेच एक बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाली. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने अभिनेत्री करिना कपूर-खानला एक कथित मुलाखत दिली. त्यात श्रेया असा दावा करते की, एका वेबसाईटच्या माध्यमातून तिने केवळ २४ हजार रुपये गुंतवले आणि त्याच्या बदल्यात तिला आठवड्याला १ ते दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे आपण या वेबसाईटवर गुंतवणूक केली असून अन्य कार्यक्रम किंवा मेहनत घेण्याचे बंद केले आहे. ही बातमी एका अग्रगण्य इंग्रजी वेबपोर्टलवर प्रसारित झाली होती. त्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसला. प्रस्तुत लेखकाने याबाबत माहिती मिळविण्याच्या उद्देशाने त्या वेबसाईटवर लाॅगइन केले. त्या वेबसाईटवर देशातील प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी आणि अन्य एका व्यक्तीचा फोटो दिसून आला. या वेबसाईटवर या दोघांनी पैसे गुंतवून त्याचा किती तरी पट परतावा मिळविल्याचा दावा करण्यात आला होता. साहजिकच सुशिक्षित असो वा अशिक्षित कोणीही अशा वेबसाईटच्या भूलथापांना बळी पडू शकतो. केवळ २४ हजार रुपये गुंतवून तुम्हाला महिन्याकाठी १ ते दीड लाख रुपये मिळत असतील, तर कोण नोकरी-धंदा करेल? असाच विचार करून अनेक जण फसतात. मुळात करिना कपूर-खान आणि श्रेया घोषाल यांचा व्हिडिओ डिपफेक होता. म्हणजेच मूळ व्हिडिओला एडिट करून आपल्याला हवा तो मजकूर त्यांच्या तोंडी घालण्यात आला होता. त्यातही दोघींच्या आवाजात ती विधाने डब करण्यात आली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. या वेबसाईटवर लॉगइन केल्यानंतर प्रस्तुत लेखकाला विदेशातून फोन कॉल यायला सुरुवात झाली. मात्र त्याला बळी न पडता आर्थिक गुंतवणूक तर दूरच, फोन कॉलसुद्धा घेण्याचे धाडस केले नाही. कारण हे लोक इतके हुशार असतात की, आधी इंग्रजीतून सुरुवात करून नंतर तु्म्हाला कळेल अशा भाषेत बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधायला लावतात. आणि आपला कार्यभाग साधतात. त्यामुळे एक तर अशा आमिषांना बळी न पडणे योग्य आणि दुसरे म्हणजे, विवेकी विचारांशी प्रामाणिक राहणे. तुमच्याकडून २४ हजार रुपये घेऊन कोणी कशाला अनोळखी माणूस आपल्याला लाखो रुपये देईल, हा तार्किक विचार आधी करायला हवा. काही वेबसाईटनी या संदर्भात फॅक्ट चेक करून हा प्रकार खोटा असल्याचे समोर आणले. मात्र तोपर्यंत अनेकांनी गुंतवणूक करून कोट्यवधी रुपये गमावले होते.
असाच प्रकार काही दिवसांपूर्वी बार्देश तालुक्यातील एका वृद्ध महिलेबाबत घडला. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावे बनावट जाहिरात देऊन क्रिफ्टो आणि इतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तिला २.६३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. www.maunto.com या वेबसाईटवरून ६७ वर्षीय वृद्ध महिलेने गुंतवणूक केली. वेबसाईटच्या आधारे ती गुंतवणूक करते म्हणजे ती साक्षरच होती. किमान २५० डॉलर गुंतवणूक करावी, अशी अट असल्यामुळे तिने वेबसाईटवर दिलेल्या माहितीच्या आधारे एका महिलेशी झूम काॅलद्वारे करून संपर्क केला. तिने या वृद्धेला गुंतवणूक करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार तिने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक करताना पैसे दामदुप्पट मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले होते. शिवाय तशा प्रकारे पैसे मिळविणाऱ्या लोकांची माहिती आणि मुकेश अंबानींच्या नावाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे तिने कसलाही विचार न करता २ कोटी ६३ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र काही कारणामुळे तिने थोडे पैसे काढण्यासाठी विनंती केली असता, त्या वेबसाईटच्या संचालकांनी टाळाटाळ केली. यात काही तरी गौडबंगाल असल्याचा संशय त्या वृद्धेला आल्यामुळे तिने हा प्रकार मैत्रिणीला कथन केला. त्यावेळी त्या मैत्रिणीने हा सायबर फ्रॉडचा प्रकार असल्याचे सांगितले. नंतर तिने सायबर विभागात तक्रार दाखल केली. मात्र त्यातून फारसे काही हाती लागेल याची शाश्वती कमी आहे. कारण सायबर गुन्हेगार इतके चलाख असतात की, अशा गुन्ह्यांची पाळेमुळे खोदून काढणे म्हणजे गवतात हरवलेली सुई शोधण्यासारखे असते.
अशा सायबर गुन्ह्यांची नोंद ठेवण्यासाठी देशात २० जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रिपोर्टीग पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलवरील माहितीनुसार, २०२० ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत गोव्यात सायबर फसवणुकीच्या ६०५२ तक्रारी नोंदवण्यात आल्या. यात तब्बल १४९.०६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपींच्या बँक खात्यांतील केवळ १३.७५ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले, तर केवळ ९.३८ लाख रुपये तक्रारदारांना परत करण्यात यश आले आहे. ही टक्केवारी ०.०६ इतकी अत्यल्प आहे. यावरून सायबर गुन्ह्यातील आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांचा छडा लावणे सोपे नसल्याचे सिद्ध होते.
मुळात आपल्याकडे कोट्यवधी रुपये असताना आणखी पैशांची हाव धरणे हेच चुकीचे आहे. अशा व्यक्ती गरजूंना पाच रुपयांचीही सढळहस्ते मदत करत नाहीत. मात्र हाती असलेल्या कोट्यवधींच्या गंगाजळीला दामदुप्पट करून चैनीत जगण्याला प्राधान्य देतात. पैशाची ही हावच फसवणूक करणाऱ्यांच्या पथ्यावर पडते. हा प्रकार सुशिक्षित लोकांच्या बाबतीत घडताना दिसतो ही एक चिंतनकारक गोष्ट आहे. असे प्रकार टाळण्यासाठी सायबर साक्षरता आणि मार्गदर्शनाची गरज आहे. पोलिसांनी असे गुन्हे घडल्यानंतर तक्रारी दाखल करून तपास करण्यात वेळ वाया न घालवता असे गुन्हे टाळण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम हाती घ्यायला हवा. काही प्रमाणात तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते फारच तोकडे आहेत. सरकारने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन ज्येष्ठांची फसवणूक टाळण्यासाठी पावले उचलायला हवीत. जेणेकरून खानापूरमधील वृद्ध दांपत्याला जसे जीवन संपवावे लागले, तसे प्रकार गोव्यात तरी घडणार नाहीत.
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय?
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे डिजिटल स्वरुपात अटक. एखादी व्यक्ती आपण पोलीस, ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करतो. ड्रग्ज, मनी लाँड्रिंग किंवा अन्य गुन्ह्यात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो. नंतर ती व्यक्ती संबंधिताला व्हॉट्सअप किंवा अन्य व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक झाली आहे, असे सांगतो. या गुन्ह्यातून सुटका व्हायला हवी असेल, तर पैशांची मागणी केली जाते. विशेष म्हणजे ही व्यक्ती व्हीडिओ कॉलवर पोलिसाच्या गणवेशात असते. त्यामुळे समोरील व्यक्ती दबावाखाली येऊन पैसं पाठवून सुटका करून घेण्यास राजी होतो.
अशी टाळा ‘डिजिटल अरेस्ट’
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, ‘डिजिटल अरेस्ट’ वगैरे डिजिटल माध्यमातून पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा कोणालाही संपर्क साधत नाही. ‘डिजिटल अरेस्ट’ टाळायची असेल, तर अकारण भांबावून न जाता संबंधित व्यक्तीला उलटसुलट प्रश्न करून काही काळानंतर संपर्क साधण्यासाठी वेळ मागून घ्यावा. या काळात १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ‘डिजिटल अरेस्ट’ हा केवळ भीतीच्या आधारावर उभा केलेला एक बागुलबुवा आहे. त्यात तथ्य शून्य आहे. जो घाबरला तो बळी पडला, इतकेच या प्रकाराचे अस्तित्व आहे.
सचिन खुटवळकर
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)