मध्यंतरीच्या काळात अमित पाटकर यांनी विविध मतदारसंघांत नव्या समिती स्थापन करून गती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, विधानसभा निवडणूक आली की तिकिटासाठी काँग्रेस भवनात हेलपाटे मारणाऱ्या आणि इतर वेळी भाजपला फायदा करून देण्यासाठी काम करीत असलेल्या नेत्यांकडून मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे चक्रव्युहात फसलेले अमित पाटकर हा चक्रव्यूह भेदून पुढील नऊ महिन्यांत प्रदेश काँग्रेसला ऊर्जा देणार की आगतिक होऊन पक्षाला रामराम ठोकणार, हे पुढील काहीच महिन्यांत दिसून येईल.
२०२७ मध्ये होणाऱ्या राज्य विधानसभेची रंगीत तालीम असलेली जिल्हा पंचायत निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होईल. ही निवडणूक संपताच २०२६ च्या सुरुवातीपासूनच राज्यातील सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीस सुरुवात होईल. तसे पाहिल्यास सत्ताधारी भाजपने गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांनी मात्र आतापासूनच तयारी करण्यात फारसा रस दाखवलेला नाही. २०१२ पासून आतापर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांतून धडा घेऊन काँग्रेस सुधारेल आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करीत भाजपला धोबीपछाड देईल, अशी अपेक्षा राज्यभरातील काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होती. परंतु, प्रदेश काँग्रेस आणि या पक्षातील नेत्यांची सध्या सुरू असलेली वाटचाल पक्षाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने सुरू आहे की भाजपला सलग चौथ्यांदा सत्तेत बसवण्यासाठी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ कार्यकर्त्यांसह राज्यातील काँग्रेसच्या मतदारांवर आलेली आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत कुडचडेतून काँग्रेसच्या उमेदवारीवर मैदानात उतरलेल्या अमित पाटकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देत, भाजपप्रमाणेच आपण नव्या चेहऱ्यांना संधी देत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या श्रेष्ठींनी केला. तरुण, तडफदार अमित पाटकर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचे जुने, नवे एकत्र येऊन पाटकर यांच्यासाठी काम करतील, पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचे प्रयत्न करतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण, प्रदेश काँग्रेसमध्ये पडलेली फूट, स्पष्टपणे दिसत असलेले दोन गट, इतर पक्षांशी हातमिळवणी करून अमित पाटकर यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि पक्षकार्यात काडीचाही सहभाग नसलेल्यांना मिळत असलेली मोठमोठी पदे यातून प्रदेश काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.
‘राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि त्यानंतर आपण’ हे ब्रीद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते पुढे जात आहेत. एक निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या निवडणुकीची तयारी त्यांच्याकडून सुरू होते. निवडणूक काळात पक्षाचे गट ते राज्य पातळीवरील नेते, कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतात. त्याचे फळ भाजपला यशाच्या रुपात मिळते. २०१२ पासून प्रदेश भाजपने ही परंपरा कायम राखलेली आहे. पक्षाच्या एखाद्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी कारवाई केल्यास शिस्तीच्या नावाखाली तत्काळ त्याच्यावर कारवाई होते. त्यामुळे पक्षाविरोधात काम करण्याची भाजप कार्यकर्त्यांना हिंमत होत नाही. प्रदेश काँग्रेसची परिस्थिती मात्र नेमकी उलटी आहे. काँग्रेसला गोव्यातून नष्ट करण्याचे काम स्वत:चा पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणवून घेणारे नेतेच करीत आहेत. पक्षात ‘घरभेदी’ कोण आहेत, याची पूर्ण माहिती असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रभारी किंवा अध्यक्षांमध्ये नाही. संघटनात्मक पातळीवर तर काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. चाळीसही मतदारसंघांत पक्ष संघटना बळकट करणार असल्याची केवळ नारेबाजी प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांकडून होत आहे. पण, वास्तवात यातील काहीही सत्यात उतरत नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात अमित पाटकर यांनी विविध मतदारसंघांत नव्या समिती स्थापन करून गती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, विधानसभा निवडणूक आली की तिकिटासाठी काँग्रेस भवनात हेलपाटे मारणाऱ्या आणि इतर वेळी भाजपला फायदा करून देण्यासाठी काम करीत असलेल्या नेत्यांकडून मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे चक्रव्युहात फसलेले अमित पाटकर हा चक्रव्यूह भेदून पुढील नऊ महिन्यांत प्रदेश काँग्रेसला ऊर्जा देणार की आगतिक होऊन पक्षाला रामराम ठोकणार, हे पुढील काहीच महिन्यांत दिसून येईल.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत स्व. मनोहर पर्रीकर यांनी भाजपला राज्यात घवघवीत यश मिळवून देत सरकार स्थापन केले. खाण घोटाळा आणि घराणेशाहीचा आरोप करीत भाजपने सत्ता काबीज केली. अगदी केंद्रीय पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत भाजपकडून काँग्रेसवर वारंवार घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. त्याचा मोठा फटका पक्षाला बसत असल्याचे दिसूनही काँग्रेस नेतृत्व नेमके तसेच निर्णय घेत, भाजपचे आरोप खरेच असल्याचे सिद्ध करून दाखवत आहेत. महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे काँग्रेसमधील तसे वजनदार पद. सरकारच्या एखाद्या निर्णयाचा महिलावर्गाला फटका बसत असेल, महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत असतील किंबहूना राज्यातील इतर अनेक प्रश्नांवरून सरकारला वारंवार कोंडीत पकडत राहण्याचे काम महिला काँग्रेसने करावे आणि त्यात अध्यक्षाने पुढाकार घ्यावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. प्रतिमा कुतिन्हो यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने काही प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ की पळो करून सोडले होते. त्यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र ही स्थिती महिला काँग्रेसमध्ये दिसली नाही. त्यात कुतिन्हो यांच्यानंतर पक्षाने या पदावर माजी खासदार स्व. शांताराम नाईक यांच्या पत्नी बीना नाईक यांची महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्यांच्यानंतर आता माजी केंद्रीय नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. रमाकांत खलप यांच्या सून प्रतीक्षा खलप यांची नियुक्ती केली आहे. मुळात पक्षासाठी वारंवार रणांगणात उतरलेल्या आणि उतरत असणाऱ्या, विविध विषय घेऊन आपापल्या मतदारसंघांतील आमदारांना घेरत असलेल्या काही महिला पक्षात असतानाही काँग्रेसने प्रतीक्षा खलप यांची या पदावर नेमणूक करीत भाजपचे घराणेशाहीचे आरोप
आणखी मजबूत केले आहेत. मोठ्या पदांसाठी कोणतेही निकष न लावता, संघटनात्मक काम न पाहता मर्जीतील व्यक्तींची नेमणूक करण्याच्या निर्णयामुळे दर्जेदार काम करूनही खितपत पडलेल्या अनेक महिला पक्षापासून दुरावत चालल्या आहेत, हे वास्तव अजिबात नाकारता येणार नाही.
गोव्यातील राजकीय बदलांचे प्रतिबिंब देशाच्या राजकारणात झळकतात, हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून काँग्रेसने ज्येष्ठ, शांत, संयमी माणिकराव ठाकरेंकडे गोव्याचे प्रभारीपद सोपवले. त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रभारी सचिव म्हणून डॉ. अंजली निंबाळकरांची निवड झालेली आहे. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही नेत्यांनी वारंवार गोव्याचे दौरे करून पक्षांतर्गत परिस्थिती समजून घेतलेली आहे. त्यामुळे ‘घरभेदी’ कोण? हे निश्चित ठावूक झालेले असावे. तरीही पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, इतकाच इशारा वारंवार देऊन ठाकरे परतत आहेत. पण, शिस्तीत राहत नसलेले चव्हाट्यावर येत असतानाही त्यांच्याकडून कडक कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहे. पुढील निवडणुका अमित पाटकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी अनेकदा केलेली आहे. पण, पाटकरांचे हात बळकट करण्यासाठी ठाकरे संघटनात्मक दृष्ट्या ठोस पावले उचणार की काँग्रेसमध्ये ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरूच राहणार, हे हळूहळू दिसून येत राहील.
सिद्धार्थ कांबळे
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)