१९९१ मध्ये रवी नाईक मुख्यमंत्री बनल्याने राष्ट्रपती राजवट संपली, पण १८ दिवसांचे एक-सदस्यीय सरकार, पक्षांतरबंदीसाठी केलेला मंत्रीमंडळ विस्तार, राजकीय अस्थिरता, गुंडगिरी, पत्रकारावर हल्ला आणि स्मगलिंगच्या आरोपांमुळे गोव्यात खळबळ माजली.
२५ जानेवारी १९९१ रोजी मगो (रवी नाईक गट) नेते रवी नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ४२ दिवसांची राष्ट्रपती राजवट संपली. दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री या नात्याने मोठ्या दिमाखात झेंडावंदन केले आणि सलामी स्वीकारली. रवी नाईक यांचा एकट्याचाच शपथविधी झाला होता. २५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी हे १८ दिवस रवी नाईक यांचे ‘वन मॅन’ सरकार गोव्यात होते. रवी नाईक मगो गटातील इतर ५ आमदारांचा रवी नाईक यांच्याबरोबरच शपथविधी होणार होता. फुटीर आमदार पक्षांतरविरोधी कायद्याखाली अपात्र ठरु नये म्हणून एकूण आमदारांच्या किमान एक तृतीयांश आमदार फुटणे गरजेचे होते.
पाच आमदार तयार होते. सहावा आमदार मिळत नव्हता. सरतेशेवटी पाळीचे आमदार विनयकुमार उसगावकर गळाला लागले आणि ११ फेब्रुवारी १९९१ रोजी रवी नाईक गटातील शंकर साळगावकर, पांडुरंग राऊत, अशोक साळगावकर, रत्नाकर चोपडेकर, संजय बांदेकर व विनयकुमार उसगावकर या सहा मंत्र्यांचा शपथविधी घेऊन मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला.
संपूर्ण फेब्रुवारी महिना उपसभापती प्रकाश वेळीप आणि सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट यांना हटवून एका वर्षापूर्वी उचलबांगडी केलेले उपसभापती सायमन डिसोझा यांची पुनर्स्थापना करण्यात गेला. उपसभापती सायमन डिसोझा यांनी व माजी सभापती प्रा. सिरसाट यांनी आमदार म्हणून अपात्र ठरविलेले मुख्यमंत्री रवी नाईक व त्यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रत्नाकर चोपडेकर व संजय बांदेकर यांना फेरपात्र ठरवले. सभापतींनी दिलेल्या निवाड्याचा फेरविचार करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही असा दावा माजी सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी केला पण सत्तेपुढे शहाणपणा नाही याचाच प्रत्यय आला. उपसभापती व सभापतींची उचलबांगडी करून काँग्रेस पक्षाचा उपसभापती निवडून तीन आमदारांना फेरपात्र ठरविल्यावर सर्व काही स्थिरस्थावर झाले आणि मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सुटकेचा श्वास घेतला. १२ एप्रिल १९९१ रोजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी आपला मगो पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करून ते काँग्रेसवासी झाले आणि दोन वर्षांनंतर परत एकदा काँग्रेसचे सरकार आले.
१९९० साल हे गोव्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत अनिश्चितेचे होते. सरकारचा पोलिसांवरील वचक कमी झाला होता. सांताक्रूझ परिसरात ‘गोवा प्रोटेक्टर्स’ ही संघटना कार्यरत होती. प्रोटेक्टर्स या नावाने गुंडगिरी, लूटमार आणि पर्यायी न्यायालय चालविले जात होते. या गावातील सामाजिक कार्यकर्त्यां व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचा या संघटनेला आशीर्वाद असल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलीस अधिकारीही त्यांना घाबरून असायचे. याच सुमारास ‘ओ हेराल्डो’ या इंग्रजी दैनिकाचे मुख्य प्रतिनिधी अँथोनी फर्नांडिस या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला. गोव्यात नव्याने सुरू झालेल्या ‘मटका’ व्यवसायात गोवा प्रोटेक्टर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या भ्याड हल्ल्यात गोवा प्रोटेक्टर्सचा हात आहे हे स्पष्ट होते. हा हल्ला झाला. तेव्हा प्रस्तुत लेखक ‘गुज’ या पत्रकार संघटनेचा अध्यक्ष होता. हल्लेखोरांना अटक करा म्हणून ‘गुज’ ने पणजी फेरीबोट धक्क्यावर साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे सरकारवर दडपण वाढले. कायदा व सुव्यवस्था राखून गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले. ‘गोवा प्रोटेक्टर्स’ सारख्या संघटनावर बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. व्हिक्टोरिया फर्नांडिस व त्यांचे पूत्र रुडॉल्फ या दोघांना ‘रासुका’ खाली स्थानबद्ध करण्यात आले. गोव्यात कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही अशी जाहीर तंबी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी देताच सांताक्रूझ परिसरातील वाटमारी बंद झाली. कथित गुंड भूमिगत झाले. गोवा गुंडगिरी मुक्त झाला.
गोव्यातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचे बंधू अल्वेरनाझ आलेमाव व कस्टम अधिकारी कोस्तांव फर्नांडिस यांच्यात झालेल्या झटापटीत आलेमांव याचा अंत झाला. आल्वेरनाझ आलेमाव सोन्याच्या तस्करीत गुंतला आहे असा संशय असल्याने कस्टम पथक त्यांना पकडण्यासाठी गेले होते. कस्टम अधिकारी येत असल्याचा सुगावा लागताच आल्वेरनाझने मोटारीत बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. कस्टम अधिकारी कोस्तांव फर्नांडिस यांनी आपल्या मोटारीतून त्याचा पाठलाग केला. धावत्या मोटारीतून पाठलाग करताना झालेल्या झटापटीत आल्वेरनाझ गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
१६ मे १९९१ रोजी घडलेली ही घटना केवळ गोव्यातच नव्हे तर देशभर गाजली. आलेमाव बंधू मच्छीमारी व्यवसायत होते. त्यांचे इतर काही काळे धंदे असावेत असा संशय होता. त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर लोकांचा पटकन विश्वास बसला. या चकमकीत गुंतलेले कस्टम अधिकारी कोस्तांव फर्नांडिस १८ मे रोजी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना उत्तर गोवा सत्र न्यायालयात उभे केले असता सत्र न्यायाधीश एस. बी. नाईक यांनी त्यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले असता मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला.
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २१ मे १९९१ रोजी पंतप्रधान राजीव गांधी गोव्यात आले होते. त्यावेळी डॉ. विली डिसोझा यांनी त्यांची भेट घेऊन मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. गांधी यांनी त्याला मान्यता दिली. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राजीव गांधी तमिळनाडूला गेलेले असताना त्यांंची हत्या झाली. त्यामुळे लांबणीवर पडलेला मंत्रीमंडळ विस्तार १ जून रोजी झाला. डॉ. विली डिसोझा उपमुख्यमंत्री, तर फ्रान्सिस सार्दिन व लुईझिन फालेरो मंत्री बनले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू असताना मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला. निवडणूक आयोगाने या आचारसंहिता भंगाची कोणतीही दखल घेतली नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी १२ जून रोजी गोव्यात मतदान होणार होते. सासष्टी तालुक्यातील दोन आमदार स्मगलिंग एजंट असल्याची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे गोव्यात मोठी खळबळ माजली. चर्चिल आलेमाव त्याचे बंधू ज्योकी आलेमाव व इतर काही लोकांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून केंद्रीय महसूल अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. या पुराव्यांची छाननी केल्यानंतर चर्चिल आलेमाव, ज्योकिम आलेमाव, सियाब्रो आलेमाव हे आलेमाव बंधू व इतर तिघांविरुद्ध कॉफेपोसा कायद्याखाली कारवाई करण्यास गोवा कस्टमला केंद्रीय महसूल मंत्रालयाने मान्यता दिली. मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याकडे ही फाईल पोहोचताच त्यांनी लगेच मान्यता दिली. ही माहिती पोलीस खात्यांतील खबऱ्यांनी लगेच चर्चिलला पुरविली. त्यामुळे अटक वॉरंट घेऊन पोलीस पोहोचले तेव्हा चर्चिल फरार झाले होते, तर ज्योकिम बाहेरुन कुलूप लावलेल्या एका खोलीत लपलेले होते.
चर्चिलला कॉफेपोसाखाली अटक होणार ही बातमी मला त्या दिवशी दुपारीच मिळाली होती. चर्चिलला अटक ही एक्सक्लुसिव्ह बातमी देण्यासाठी मी रात्री अडीचपर्यंत थाबलो होतो. पण काही लाळघोट्या पोलिसांमुळे ‘चर्चिलच्या अटकेचे वॉरंट’ एवढीच बातमी द्यावी लागली. १९९१ मधील गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रसिद्ध झालेली ही बातमी त्या वर्षीची सर्वात मोठी बातमी ठरली!
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)