तिच्यासाठी ‘ती’

घरणीबाई आणि पुराणातील स्त्रिया म्हणजे अगदी जिवलग मैत्रिणी. या पुराणातील स्त्रिया घरणीबाईच्या ओव्यांतून तिची भेट घेत असत. म्हणूनच तर घरणीबाई वेळोवेळी या आपल्या पुराणातील मैत्रिणींना आपल्या ओव्यांमधून जिवंत करीत असे. स्वतःला त्यांच्या रूपामध्ये बघत असे.

Story: भरजरी |
30th March, 03:31 am
तिच्यासाठी ‘ती’

घरणीबाईने आपल्या ओव्यांमधून रामायणही रचले आणि महाभारतही रचले. पण घरणीबाईचे रामायण महाभारत हे तिच्या संसारी कल्पनांच्या परिघाच्या आतले आहे. त्यामुळे तिच्या ओव्यातील रामायण महाभारत किंवा इतर पुराणकथांना वास्तवापेक्षा भावनांचा स्पर्श जास्त जाणवतो. महाभारतातील एक गोष्ट सर्वांच्या परिचयाची आहे. पांडव द्रौपदीसह वनवास भोगत असताना एके दिवशी दुर्योधनाच्या सांगण्यावरून आपल्या अनेक शिष्यांसह दुर्वास ऋषी पांडवांच्या निवासस्थानी जाऊन भोजनाची मागणी करतात. द्रौपदीकडे श्रीकृष्णाने भेट दिलेले अक्षयपात्र होते ज्याच्यातून हवे ते भोजन हवे तितक्या प्रमाणात प्राप्त होत असे. पण हे दिव्य अक्षयपात्र दिवसातून एकदाच भोजन प्राप्त करून देत असे. दुर्वास ऋषी ज्यावेळी पांडवाच्या पर्णकुटी समोर आले त्यावेळी भोजनाची वेळ निघून गेली होती आणि अक्षयपात्रामधून द्रौपदीने सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. वनवासात असल्यामुळे ऐनवेळी आलेल्या दुर्वास ऋषींच्या भोजनाची सोय कशी करावी ह्या विवंचनेत द्रौपदी असताना तिचा मानलेला भाऊ प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येतो आणि अक्षयपात्राला चिकटलेले फक्त एक भाजीचे पान खाऊन ढेकर देतो. त्या सरशी दुर्वास ऋषींच्या शिष्यांसह त्यांचे स्वत:चेही उदर तृप्त होते. बहिणीच्या संकटाला दूर करण्यासाठी श्रीकृष्ण भाऊ कसा तत्पर असतो हे सांगणारी ही गोष्ट घरणीबाई आपल्या ओव्यातून मांडताना दिसते. 

पांडवाच्या राजा, सदी न दिवाळी
आरत ववाळी पाच, पांडवाची दुरपती
दुरुपत रांदुक गेली हांडी, ठेविली लिंबवा एदी
साठनी तीनशे ऋषी, बसले एके पंगती
डुक गेली नेणती, पाच पांडवांची दुरपती
अन्नाच्यो झाल्यो राशी

पांडवांच्या राज्या सदि न दिवाळी असे म्हणताना घरणीबाई सुचवते की पांडव दानशूर होते की त्यांच्या घरी नेहमी याचकांची ये जा असायची. त्या याचकांची द्रौपदी पंचारत ओवाळून स्वागत करायची. त्यांच्या जेवणाखाण्याचे स्वतः जातीने बघायची. पुढे पांडवांच्या पदरी दैन्य जरी आले तरी तिने आपला हा वसा सोडला नाही. वनवासात गरिबीत दिवस घालवत असताना पांडवांच्या घरी ३६० ऋषी जेवण करण्यासाठी आले. लिंबाएवढीच हंडी म्हणजे छोट्याशा भांड्यात जेवण रांधलेले असताना अचानक तीनशे साठ ऋषी. ऋषींच्या जेवणाची व्यवस्था कशी करावी ह्या विवंचनेत असलेल्या द्रौपदीच्या सत्त्वाने अन्नाच्या राशी उभ्या झाल्या. इथे सत्त्व हा शब्द फार महत्त्वाचा ठरतो. 

घरणीबाई किंवा तत्कालीन स्त्रिया किंवा आजपर्यंत शालिन स्त्रिया प्राणपणाने जर काही जपत असतील, तर ते आहे आपले सत्त्व. सत्त्व म्हणजे आपले शील. आपल्या चारित्र्यावर एकही डाग लागू न देणे. हीन दर्जाचे कुठलेही काम न करणे. आपला परिवार, शेजारपाजार यांना राखून ठेवणे,  नेहमी खरं, सत्याची कास धरणे म्हणजेच एखाद्या स्त्रीने आपले सत्त्व जपणे. पण अशा प्रकारे सत्त्व म्हणजे काय? हे जर घरणीबाई आपल्या घरातील सुना-लेकींना सांगत बसल्या, तर त्यात कोणालाही रस असणार नाही हे जाणूनच घरणीबाई अशा कथानक असलेल्या ओव्यांमधून सत्त्वाचे आणि शिलाचे धडे देते. द्रौपदी फक्त आपल्या सत्त्वाच्या आधारे अन्नाच्या राशी उभ्या करू शकते. ह्या सत्त्वाची महती किती आहे हे ऐकणाऱ्या कुठल्याही नेणत्या स्त्रीलाही सहज समजू शकते. 

अशी सत्त्ववान द्रौपदी तीनशे साठ ऋषींना जेवण वाढू लागली. त्यात पण तिचे दुष्ट वृत्तीचे दिर कौरवही बसले होते. पण जेवण वाढता वाढता अगळीक घडली.

अन्नाच्यो झाल्यो राशी, दुरपत वाढून गेली
गाठ सुटली चोळीयेची, सभा उठली कैरावांची
लजा गेली ती अर्जुना, पापिया दुर्योधना
लजा केली रे एवढ्या जना 

जेवण वाढताना तिच्या चोळीची गाठ सुटली. तिचे वस्त्र तिच्या अंगापासून दूर झाले. अशा नाजूक वेळी तिला मदत करायची सोडून सर्व स्त्रीलोलूप कौरव वासनेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले. आपल्या धर्मपत्नीची अशी अवस्था पाहून अर्जुनाला आपली लाज गेल्यासारखे वाटले. त्याने आपली मान खाली घातली. दृष्ट दुर्योधनाने विवस्त्र होऊ घातलेल्या द्रौपदीला पाहून आपली मांडी ठोकली. हे सर्व तिच्यासाठी सहन होण्यापलीकडचे होते. अशावेळी ते आपला बंधू कृष्णाची आळवणी करते... 

लजा केली रे एवढ्या जना, कृष्णा तिचं बंधू
उभो रवलो सतवासी, रवलो सतवासी
कृष्णान लुगडी पुरयली

भर जनामध्ये द्रौपदीचा असा अपमान होताना पाहून तिचा सखा, मित्र, बंधू कृष्ण बेचैन होतो. तिच्या सत्त्व रक्षणार्थ तो उभा राहतो. विवस्त्र होऊ घातलेल्या द्रौपदीला कृष्ण लुगडी म्हणजे कापड पुरवतो. कृष्ण द्रौपदीचे सत्त्व राखतो. 

महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण आम्हा सर्वांनाच माहिती आहे. ही ओवी वाचतानाही आपल्याला बरोबर त्याच प्रसंगाचे वर्णन घरणीबाईने केले आहे की काय असे वाटते. पण इथे घरणीबाईने द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे वर्णन न करता स्वतःला आलेल्या अनुभवांचे वर्णन द्रौपदीच्या रूपाने केले आहे. घरणीबाई अन्नपूर्णा बनून जेव्हा इतरांच्या ताटात घास वाढत असे तेव्हा कित्येकदा वखवखलेल्या नजरा तिच्या शरीराचे लचके तोडत असायच्या. ह्या नजरेचे घाव तिने कित्येकदा अनुभवलेले होते. या घावामुळे ती कित्येकदा घायाळ झाली होती. पण प्रसंगी तिने आपले स्वत्व राखून ठेवले होते. कारण तिला माहीत होते की आपण जर सत्त्वशील असलो तर अशा वखवखलेल्या नजरा आपले काहीही नुकसान करू शकणार नाहीत. द्रौपदीसारख्या शीलवान असलेल्या घरणीबाईचा कृष्ण कोणत्या ना कोणत्या रूपाने तिच्या मदतीसाठी नक्की येईल असा तिला आपल्या कृष्णावर पूर्ण विश्वास होता.  कौरवासारख्या दृष्टवृत्ती बाळगणाऱ्यांपासून तिचे रक्षण करीत असे आणि या सत्त्वाचे बाळकडू ती ओव्यांमधून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करीत असताना म्हणत असे... 

कृष्णा तिचं बंधू, उभो रवलो सतवासी
रवलो सतवासी, कृष्णान लुगडी पुरयली


गाैतमी चाेर्लेकर गावस