हवा महल

आकाशवाणीवरील 'हवा महल' हा १९५७ पासून प्रसारित होणारा लोकप्रिय विनोदी नाटिका कार्यक्रम आहे. विविध भारतीवर दररोज रात्री प्रसारित होणाऱ्या या १५ मिनिटांच्या स्किटने अनेक दशके श्रोत्यांचे मनोरंजन केले असून, आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

Story: ये आकाशवाणी है |
30th March, 03:44 am
हवा महल

आकाशवाणीवरून देशभर स्थानिक, प्रादेशिक भाषांतून श्रुतिका म्हणजे नभोनाट्य प्रसारित होतं. त्याला ‘रेडिओ प्ले’ असंही म्हणतात. एके काळी आकाशवाणी त्या त्या भाषांसाठी अखिल भारतीय रेडिओ प्ले स्पर्धा व्हायची आणि सर्व भाषांसाठी पुरस्कार दिले जायचे. त्यात एक विनोदी नाटिका गटही होता. आकाशवाणीचं हे योगदान फार मोठं आहे. ऐतिहासिक आहे. देशव्यापी श्रोत्यांना त्याद्वारे मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे.

विविध भारतीवर हिंदीतून होणारे संवादात्मक कार्यक्रम सर्व देशाला जोडतात. हवा महल हा असाच कार्यक्रम. अत्याधिक लोकप्रिय. आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या सर्व प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी, कोणत्याही स्वरूपातील बदलाशिवाय सर्वात दीर्घ काळ कार्यक्रम होण्याचे श्रेय हवा महलला जाते. ही नाटिका सर्वात आधी २० ऑक्टोबर १९५७ रोजी प्रसारित केली जात आहे. हवा महलमध्ये दररोज पंधरा मिनिटांचा एक स्किट म्हणजे नाटिका असते. त्यात उपहास, चिमटे, विनोद, हास्यरस असतो. दररोज संध्याकाळी, लाखो श्रोते रेडिओवरील ही हवा महल नाटिक ऐकतात. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यात वस्तुपाठ ठरणारी संहिता असते. संहिता लेखन चांगलं असलं तरी अनुभवी तयार कलाकार लागतात. हे सर्व छानपणे या कार्यक्रमात जुळून आलेलं असतं. त्यात आत्यंतिक प्रोफेशनलिझम असतं. इतर केंद्रांनी शिकावं असं. इतर कलाकार यातून खूप काही शिकू शकतात. 

  हवा महलचा पहिला भाग पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिला होता. ते एक संगीतमय नाटक होतं. या कार्यक्रमासाठी स्किट, किस्से आणि कथा लिहिल्या जात आहेत किंवा रूपांतरित केल्या जात आहेत.

विविध भारती त्यांच्या कार्यक्रमांसाठी आकर्षक सिग्नेचर ट्यूनसाठी ओळखली जाते आणि हवा महलचाही अपवाद नाही. सिग्नेचर ट्यून प्रथम पंडित सत्येंद्र शरथ यांनी गुजराती गाण्यावर आधारित रचली होती.  परंतु नंतर, त्यांनी १९६० मध्ये एक नवीन निर्माण केली, जी अजूनही वापरात आहे.

तीस आणि त्यावरील वयोगटातील दहा लाख लोकांना ही सिग्नेचर ट्यून वाजवा आणि त्यांना विचारा की ती काय आहे. किमान ९० टक्के लोक ही ट्यून हवा महलची असल्याचे ओळखतील, असे एका अधिकाऱ्याने अभिमानाने सांगितले. 

'हवा महल हा फक्त पंधरा मिनिटांचा छोटासा कार्यक्रम असूनही, श्रोत्यांना खूप प्रभावीपणे गुंतवून ठेवतो. विविध भारतीसाठी हा एक मोठा महसूल मिळवून देणारा कार्यक्रम आहे आणि सहा महिने आधीच ठिकाणे बुक केली गेली होती,' असे आकाशवाणीच्या मार्केटिंगच्या निवृत्त प्रमुख सुखजिंदर कौर म्हणतात. जाहिरात देण्यासाठी दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागते इतकी त्याची लोकप्रियता आहे.

हवा महल हा भारताच्या विविध भारती रेडिओ चॅनेलवर दररोज रात्री प्रसारित होणारा लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रत्येक प्रसारणात लेखकाने लिहिलेल्या कथेची नाट्यमय आवृत्ती असते.

हवा महल हा विविध भारतीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. नाटकांचा आणि स्किट्सचा हा कार्यक्रम पन्नास वर्षांनंतरही तितक्याच लोकप्रियतेने सुरू आहे हे त्याचे रहस्य व जादू आहे. पूर्वी हा कार्यक्रम रात्री ९.१५ वाजता होत असे. आज त्याची वेळ रात्री ८ वाजता आहे. हवा महलसाठी देशभरातून पुरेशी नाटके तयार करून पाठवली जातात. अनेक लेखकांच्या प्रतिभेला व सृजनशील निर्मिती क्षमतेला ही एक संधी असते. एकेकाळी असरानी, ओम पुरी, ओम शिवपुरी, अमरीश पुरी, दिना पाठक, युनूस परवेझ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपट कलाकारांनी हवा महलच्या नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. हवा महलच्या अनेक आठवणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. लोकांना गुंतवून ठेवण्यात व त्यांची मनोरंजनाची सेवा करण्याचं मोठं श्रेय विविध भारतीच्या हवा महलला जातं.


मुकेश थळी

(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)