शिगमा आणि मी

'ओस्सय! ओस्सय! ओस्सय! ओस्सय!' हा नाद तर अख्खं अंग अत्यंत धसमुसळेपणाने घुसळवून सगळा शीण घालवतो. या शिगम्यात लांब राहून का होईना पण आपलं सोवळं मनही या अत्यानंदात न्हाऊन निघतं.

Story: विशेष |
30th March, 03:29 am
शिगमा आणि मी

बालपण हे अतिशय निरागस असतं. स्वत्वाची, अभिमानाची, स्वाभिमानाची अन् दुराभिमानाची पुटं नंतरच्या काळातील जडणघडणीदरम्यान चढत जातात. स्वशाखा, स्वजात, स्वभाषा, स्वसंस्कृती, अभिजन-बहुजन, ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे थर-पदर आपल्या राशीला येतात. पण बालपणाला याचा लवलेशही स्पर्शत नाही. जे काही आनंददायक व सुखकारक असेल ते ते सर्व काही बालपण स्विकारत, आपल्या रम्य आठवणींच्या कप्प्याला समृध्द करत, आपल्याला किशोरवयाकडे सावकाशपणे सरकवत असतं. 

अनेक सांस्कृतिक सणावारांप्रमाणे मलाही 'शिमगा' उर्फ 'शिगमा' प्राणप्रिय होता व आहे. शिगमा म्हणजे आनंद, शिगमा म्हणजे उत्साह, शिगमा म्हणजे मज्जाच मज्जा! शिगमा म्हणजे माकडांचे, वाघांचे, सिंहांचे, बोक्यांचे अन् विविध प्रकारचे अक्राळविक्राळ तसेच मजेशीर मुखवटे! शिगमा म्हणजे प्रत्येक घरच्या अंगणात तुळशी वृंदावनाभोवती फेर धरून नाचत शिगम्याची गाणी म्हणणारे खेळेमेळे, व सोबत वेगवेगळी मजेशीर सोंगं घेऊन 'शबय' मागणारे कष्टकरी, शिगमा म्हणजे तुमच्या भाटात, कुळागरात, काजू बागायतीत घुसून शहाळी, कैऱ्या, काजू मनसोक्तपणे काढून खाणारे 'चोर'! शिगमा म्हणजे एक बांबूला मधोमध एक आंब्याचा टाळा बांधून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून खास शिगम्यातला टोल वसूल करणारी इवली इवली चिमुरडी मुलं! शिगमा म्हणजे वर्षभर मन आणि अंग आंबवणारा शिष्टपणा झटकून मनसोक्तपणे बेधुंद होऊन नाचणं, शिगमा म्हणजे ढोल आणि तोणया, तासा आणि बडी, दोन मोठ्ठाली कासांळीं, शिगमा म्हणजे मांडावर वाजवला जाणारा भलामोठा नगारा, शिगमा म्हणजे वार्षिक 'देवस्पण' जिथे पार पाडतात तो शिगम्याचा मांड! 

वर्षभर अंगावर कातडीसारखी वागवलेली शर्टची इस्त्री मोडून शिगम्यात बिनधास्तपणे बेहोश होऊन नाचणारे एकेकजण पाहून मन थक्क होतं. मला घुमट आरती ही लोककला व शिगमा या लोकोत्सवाचं प्रचंड आकर्षण वाटतं. 

मी लहानपणी गावात अर्थात माझ्या वांते गावच्या गांवकरवाड्यावर मांडावर जात असे. तिथं आम्ही लहान मुलं ढोल, ताशा, कांसाळें वगैरे वाजवायचो. त्यावेळी आपण ब्राह्मण आहोत याची जाणीव नव्हती. पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसा 'तु भट मरे! रोमट वाजयता?' हा सूर अधिकाधिक वाढत गेला यातून जरी स्वाभाविक बुजरेपणा आला असला तरीही आजही शिगम्याचं आकर्षण तसुभरही कमी झालं नाही. 

माझ्या लहानपणी 'भट आणि शिगमा' याचा संबंध तसा नव्हताच. फक्त होळीच्या पुजेपुरताच पुरोहित देवराईत जायचा, ती व परत होळीची स्थापना झाली की दुसरी पूजा झाल्यावर पुरोहिताचं काम संपलं. 

माझे वडील अडकोणला ग्रामपुरोहित होते. तिथे होळी, रंगपंचमी व पालखी हे उत्सव दरवर्षी अगदी जोडून येतात. पालखी पूर्ण गावात घरोघरी जाते.‌ पालखीत विराजमान नवदुर्गा महिषासुरमर्दिनीच्या उत्सवमूर्तीची प्रत्येक घरात पूजा केली जाते. त्यावेळी पालखीच्या जोडीला रोमट असतं व त्याचवेळी रंग खेळतात. त्या लहानपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. बाबा पूजेला पालखीबरोबर असायचे. पूजा भटाने करायची व शिगमा‌ कुळवाड्यांनी खेळायचा हे समीकरण अगदी आजही गावागावात घट्ट रूजलेलं आहे. 

'आमी शिगम्या खेळव्या, नाचव्या कशा जावयाचे नाय?' याचं उत्तर 'आमी भटांऽ' हे ठरलेलं असे. ही कुंपणं ह्या मर्यादा आपण स्वतःला घालून घेतो व समाजही आपल्याला त्या परंपरेने घालायला लावत़ो. काही अस्वाभाविक अपवाद असतीलही पण ते फार म्हणजे फारच विरळ. 

आजचा सरकार पुरस्कृत शिगमोत्सव म्हणजे युवापिढीसाठी कला सादर करण्याचं एक व्यासपीठ आहे. रोमटामेळात बेभान होऊन नृत्य करणारी युवापिढी पाहून शिगम्याने रूपडं पालटलंय व नवं सोंग घेऊन काळाच्या प्रवाहात सामील झालाय असं म्हणायला हरकत नाही. ही पिढी जरी गावातील खऱ्या पारंपरिक शिगम्यापासून दूर असली तरीही या लोकोत्सवातला थोडातरी अर्क त्यांनी प्यायला आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या सरकारपुरस्कृत शिगमोत्सवात ही युवापिढी कधी राजकारण्यांच्या 'आशीर्वादाने', प्रसंगी पदरमोड करून रोमटामेळ सादर करते. चित्ररथ तयार करून ते या शिगमोत्सात सादर करते. ते चित्ररथ तयार करण्यासाठी येणारा लाखो रुपये खर्च, ते चित्ररथ राज्यभरातील प्रत्येक शिगमोत्सवात फिरवणं, सगळ्या माणसांचा खर्च वगैरे सगळं हौशीने करणारी ही पिढी पाहून थक्क व्हायला होतं. आपला वेळ, पैसा व शक्ती खर्च करून जीव ओतून हे तरूण आपली कला सादर करतात. कुणाला बक्षीसं मिळतात तर कुणाला मिळत नाहीत. पण हिरमोड न होता दरवर्षी हे तरूणांचे गट आपली अद्भूत कला वापरून अचाट देखाव्याचे चित्ररथ तयार करतात. 

यात फक्त चित्ररथच सादर होत नाहीत तर नवीन लोकगीतंही सादर होतात. 

'आंब्या तुजो ताळो आंबट! म्हादेवा देवा तुजें रोमट!
'आंब्या तुजो ताळो कोणे मोडयलो,
वांतेच्या भुरग्यांनी डाव मांडिलो!'

अशी नवी टवटवीत लोकगीतं/पदं मनाला भुरळ घालतात. वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस बाळगलेला शिष्टाचार सोसवत नाही अन् माझ्या लहानपणी देवीच्या पालखीच्या पूजेची पहिली शिफ्ट संपवून दुपारी घरी आलेले बाबा जसं, 

'वा! वा! किती आनंद झाला!
आनंद झाला, उत्सव आला!
हे लोकगीत गुणगुणत असत तसंच माझंही मन गुणगुणत सुटतं,
'सोप्यावयले आज्ये तू कितें पळयता?
बाऽ रेऽ नातवा शिगमो पळयता!'

या आनंदगीतांना कशाचीही सर नाही. 'ओस्सय! ओस्सय! ओस्सय! ओस्सय!' हा नाद तर अख्खं अंग अत्यंत धसमुसळेपणाने घुसळवून सगळा शीण घालवतो. या शिगम्यात लांब राहून का होईना पण आपलं सोवळं मनही या अत्यानंदात न्हाऊन निघतं.


प्रा. विघ्नेश शिरगुरकर