आईचे काळीज

आईच्या पदरात हे भोग पडू नयेत म्हणून त्याने शाळा सुटल्यानंतर अभ्यास करण्याचा बहाणा पुढे करत दुकानात काम करण्याचा निश्चय केला व आपली कमाई तो बाबांकडे पोहचती करू लागला. एवढा मोठा घोडा होऊनही चार पैसे रम्या कमावत नसल्याने व दारू, जुगार खेळण्यासाठी पैशांचा अभाव जाणवल्याने आपल्या हातात रम्याच्या मार्गे पैसे येतात म्हणून ते समाधानी होते.

Story: कथा |
30th March, 03:38 am
आईचे काळीज

“नालायका, तुला पोसायचा ठेका घेतला व्हय रं मी? काम ना धंदा, पन गिळायला पुढं!” 

या शब्दांच्या तडाख्याने बारा वर्षांचा ‘रम्या’ हिरमुसला. शेवटी त्याच्या आईला न राहवल्यामुळे तिने मध्यस्थी केली परंतु अर्थाचा अनर्थ करत रम्याचा राग त्याच्या बापाने आपल्या बायकोवर काढायला सुरुवात केली. बिचारी ‘इंदु’ एखाद्या अपराध्यासारखी नवऱ्याचे बोल खात होती. एवढ्यावरच न थांबता त्याने नजीकच्या काठीने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. शेजारचे धावून आले म्हणून, नाहीतर होत्याचे नव्हते होऊन बसायला वेळ लागला नसता. 

दारूच्या नशेत धुंद असणारा इंदुचा नवरा दररोज काहीतरी कारण काढून आपल्या कुटुंबावर खाकरायचा परंतु इंदु आपल्या कुंकवाचा मान राखण्यासाठी हा सगळा प्रकार सहन करायची. शेवटी तिच्या पोटच्या पोराचा तो बाप, त्याचे पितृछत्र तिला हिरावून घ्यायचे नव्हते. 

“थोडं बेतानं घ्यायचं व्हतस बाळा, काही खाऊ हवा असंल तर मला सांगायचंस... तुजा तरी काय दोष म्हना, दोन घासंच तर जास्तीचं मागितलेलं, वाढतं वय तेच्यामुळं पोटात आग तर लागणारच की! त्यांसनी फक्त निम्मितच लागतं.” 

अंगावर उठलेल्या वळांच्या वेदनेने ती विव्हळत होती पण पोर पुढ्यात असल्याने तिने स्वत:ला सावरले, स्वत:चा धीर डगमगला तर पोराचे काय होईल या विवंचनेने तिला घेरले. आईची अवस्था बघून रम्याचे काळीज पिळवटून निघत होते. 

आईच्या पदरात हे भोग पडू नयेत म्हणून त्याने शाळा सुटल्यानंतर अभ्यास करण्याचा बहाणा पुढे करत दुकानात काम करण्याचा निश्चय केला व आपली कमाई तो बाबांकडे पोहचती करू लागला. एवढा मोठा घोडा होऊनही चार पैसे रम्याचा बाबा कमावत नसल्याने व दारू, जुगार खेळण्यासाठी पैशांचा अभाव जाणवल्याने आपल्या हातात रम्याच्या मार्गे पैसे येतात म्हणून ते समाधानी होते. रम्याला आपल्या कुटुंबात एकी, शांतता हवी होती परंतु पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीप्रमाणे त्याच्या बापाचा रोजचा थयथयाट चालूच होता. 

असेच दिवस जात होते. एकदा दुकानाच्या मालकांचे पैसे चोरी गेले असता सगळा आळ रम्यावर घातला. दुकानाचे मालक नेमके त्याच्या घरी येऊन ठेपले व घडलेल्या घटनेचे कथन रम्याच्या आईकडे केले. आधीच तिला तो या कारणासाठी घरातून बाहेर पडतो हे माहीत नव्हते व त्यावर चोरी, यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. घडलेल्या गोष्टीचा सोक्षमोक्ष करण्यासाठी तिने रम्याला समोर उभे केले. 

“चोरलेले पैसे कुठंय? आईने धाक दाखवत विचारले. 

“पैसे? म... मी... नाही.!!!” 

संतापाने बेभान होऊन आईने त्याच्या गालावर सणसणीत थप्पड लगावली. आधीच पैशांची तणतण, ती कामगार असल्याने दिसावड्याच्या आधारे घर चालविणे भाग होते आणि ही नवीन समस्या तिच्या पुढ्यात आ वासून उभी होती. 

“पैसे कशापाई चोरलस, आजच्या आज कुठं लपवून ठेवलयस ते परत कर! आपलं पडलं थोडं आन् व्याह्यानं धाडलं घोडं अशी गत झालीया!”

यादरम्यान तो एकटक आईकडे बघत स्तब्ध होता. अचानक निर्धाराने तो उठून उभा राहिला. पैसे  परत करण्याचे आश्वासन देऊन तो घराबाहेर पडला. काही दिवस उलटून गेले तरीही तो घरी परतला नव्हता. विचार करून करून इंदुच्या डोक्याचा भुगा झाला होता. तिचा जीव तीळ-तीळ तुटत होता. ती व्यथित असताना दारूच्या नशेत तिचा नवरा तेथे येऊन ठेपला व स्वत:च्या तोंडून आपणच चोरी केल्याचे सत्य नशेत बरळला. 

इंदुचा धीर हे ऐकून सुटला. ती जिवाच्या आकांताने रडू लागली. निश्चयाने ती उठली आणि तिचा एकुलता एक सोन्याचा दागिना म्हणजेच बारीक, पिळदार मंगळसूत्र तिने विकले आणि मिळालेल्या पैशांनी चोरलेले पैसे परत केले आणि आपल्या काळजाच्या तुकड्याचा शोध घेण्यास ती बाहेर पडली. विचारपूस केल्यानंतर एका व्यक्तीकडून तिला त्याचा पत्ता लागला. त्यामुळे वेळ न दवडता तिने ते स्थळ गाठले. मळकटलेल्या अवस्थेत, भुकेने कासावीस झालेला रम्या जेव्हा तिला दिसला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. बूट पॉलिश करून तो चोरी गेलेले पैसे परत करण्याच्या बेतात होता, हे त्याच्या सांगण्यावरुन तिला कळले. 

आपल्या हातून अनर्थ घडला हे तिला कळून चुकले. 

“मला तुला झालेला त्रास बघवत नाय गं...” तो उद्गारला. 

त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 

“आता न्हाय व्हनार त्रास बाळा! आपन आपली येगळी वाट तयार करायची येळ आलीय...” आई भावुक होऊन म्हणाली. 

रम्या व इंदु नवीन प्रवासाच्या मार्गाला लागले...


रंजिता शेणवी देसाई
कोटकर वाडा, पेडणे ७६२०७५१२२९