दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा जणांचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 11:20 pm
दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा जणांचा मृत्यू

वाळपई/ मडगाव : रेडीघाट- वाळपई आणि फातोर्डा येथे दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. होंडा-वाळपई मार्गावरील रेडीघाट येथे दोन दुचाकींच्या जोरदार टक्करमध्ये साखळीतील २१ वर्षीय तरुण शॉन लोबोचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. त्याच वेळी, फातोर्डा येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी उल्हास ऊर्फ जीवन वाडकर यांचा मृत्यू झाला.

होंडा-वाळपई मार्गावरील रेडीघाट येथे झालेल्या दुचाकी अपघातात साखळीतील २१ वर्षीय शॉन लोबो याचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने जात असताना त्याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात त्याच्या मागे बसलेल्या प्रक्षम कर्पेसह दुसऱ्या दुचाकीवरील मारुती हरिजन आणि राधिका हळर्णकर हेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही गोमेकॉत दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाळपई पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी तातडीने जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले. शॉन लोबो आपल्या कुटुंबीयांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाला होता, मात्र नियतीने घात केला. अपघातानंतर दुचाकी पूर्णतः उध्वस्त झाली असून, वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.