कार्यालयावर आयईडी हल्ला करण्याचा महासंचालकांना ई-मेल

पोलीस खात्यासह सायबर खाते अलर्ट मोडवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 11:18 pm
कार्यालयावर आयईडी हल्ला करण्याचा महासंचालकांना ई-मेल

पणजी : गोवा पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या कार्यालयावर आयईडी हल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल शनिवारी सकाळी महासंचालकांच्या आयडीवर आल्याने राज्यात खळबळ उडाली. या ई-मेलमुळे पोलीस खाते अलर्ट झाले असून, सायबर गुन्हे विभागाकडून या ई-मेलचे मूळ शोधण्याचे काम सुरू आहे.

पोलीस महासंचालकांचे पणजीतील कार्यालयावर आयईडी हल्ला करण्याची धमकी देणारा मेल महासंचालक अलोक कुमार यांना शनिवारी सकाळी मिळाला. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस विभागाला दिल्यानंतर संपूर्ण खाते सतर्क झाले. त्यानंतर लगेचच बॉम्ब निकामी पथकाला महासंचालकांच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले. शिवाय मेल नेमका कुठून आलेला आहे, याचा शोध घेण्याचे काम सायबर गुन्हे विभागाकडून सुरू करण्यात आले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने कार्यालयाची झाडाझडती घेतली. परंतु, त्यांच्या हाती काही लागले नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून खात्याने महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, पोलीस मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल तसेच फोन कॉल्स याआधीही अनेकदा गोवा पोलिसांना प्राप्त झालेले आहेत. परंतु, मेल पाठवणाऱ्या किंवा फोन कॉल्स करणाऱ्यांवर कारवाया झालेल्या नाहीत.