निवडणुकीच्या दृष्टीनेच मंत्रिमंडळ फेरबदल

मुख्यमंत्री डॉ. सावंत; एक-दोघांना हटवले जाणार असल्याचेही केले स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 11:16 pm
निवडणुकीच्या दृष्टीनेच मंत्रिमंडळ फेरबदल

पणजी : आपल्या मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री चांगले काम करत आहेत. काम करत नाही म्हणून कुठल्या मंत्र्याला काढले जाणार नाही. एका-दोघांना हटवावे लागले तर ते पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या अनुषंगाने असेल, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी मंत्रिमंडळ फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले.


प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळ फेरबदलासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची चर्चा रंगत होती. काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी पुढील पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदल होईल असे सांगत या चर्चेला पुन्हा तोंड फोडले. त्यानंतर काहीच दिवसांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन यासंदर्भात केंद्रांतील वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या. दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या गाठीभेटी घेत मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात चर्चा केल्या. त्यानंतर येत्या मंगळवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष नाईक दिल्लीला जाणार असल्याने मंत्रिमंडळ फेरबदल पुढील काहीच दिवसांत होणार हे निश्चित आहे.

या पार्श्वभूमीवर ‘हेडऑन’मध्ये याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, आपल्या मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री चांगले काम करीत आहेत. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यानुसार त्यांचे काम सुरू आहे. काम करत नाही म्हणून कुठल्याही मंत्र्याला काढले जाणार नाही. एका-दोघांना हटवावे लागले तर ते पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या अनुषंगाने असेल. पुढील विधानसभा निवडणूक जिंकून सलग चौथ्यांदा राज्यात सरकार स्थापन करणे हेच आपल्या पक्षाचे ध्येय आहे. त्यामुळे सरकार घडवण्याच्या दृष्टीनेच मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले.