उत्कंठावर्धक, खिळवून ठेवणारी कादबंरी : करार

अश्वेता परब यांच्या 'करार' या पहिल्याच कादंबरीत प्रेम, त्याग आणि विरहाची अनोखी कथा आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित, धक्कातंत्राचा वापर करत लेखिकेने वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे, एक वेगळा अनुभव देणारी 'करार' नक्की वाचा!

Story: तिचे पुस्तक |
29th March, 12:14 am
उत्कंठावर्धक, खिळवून ठेवणारी कादबंरी : करार

अश्वेता अशोक परब यांनी लिहिलेली ‘करार’ ही लेखिकेची पहिलीच कादंबरी असूनही त्यांनी ती छान कथानकाद्वारे काहीसा धक्कातंत्राचा वापर करून शेवटपर्यंत छान खुलवत नेली आहे. मुखपृष्ठावरून वाचक प्रथमत:च या कादंबरीविषयी विविध अंदाज बांधण्यास प्रवृत्त होतो. स्त्री आणि पुरुष आणि करार म्हणजे लिव्ह इन रिलेशीनशीपवर तर ती नाही ना, असाही एक संशय येतो. पण कादंबरी उलगडत जाते तशी वाचकांना आपल्या एकेका प्रश्नाची उत्तरे मिळत जातात. कादंबरी संपते तेव्हा एक छान, वेगळा अनुभव घेतल्याचे समाधान वाचकांना नक्कीच मिळते.

कादंबरीचा मूळ गाभा 'प्रेम 'आहे. 'प्रेम म्हणजेच प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं,'असं आपण ऐकलंय. पण या प्रेमकथेचा विषय खूप वेगळा आहे. त्याग, विरह, समर्पण, परिस्थितीशी दोन हात करत ही प्रेम कथा टप्प्याटप्प्याने उलगडत जाते. अनेक प्रसंगांना सामोरे जात या कादंबरीची नायिका प्रेम युद्धात विजयी होते का? यासाठी करार वाचावी लागेल. एखाद्या कादंबरीसाठी लागणारा सर्व प्रकारचा मसाला त्यात आहे. प्रेम, लग्न, संसार, अपघात, वैद्यकीय इलाज, घरगुती काम आणि अशा प्रसंगांची रेलचेल असली तरी कादंबरी कुठेच कंटाळवाणी वाटत नाही.

कथानक गोव्याच्या पार्श्वभूमीवरच घडताना दिसते. गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, शांत, सात्त्विक देवळे, मोठमोठ्या चर्चेस असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गोव्यातील एका गावातल्या कुटुंबाभोवती ह्या कादंबरीचे कथानक फिरते. गोव्यातील स्थळांचा किंवा परिचित अशा उद्योगपतींच्या नावांचा उल्लेख कथानकाबद्दल आपलेपणा वाटायला लावतो. आपण जणू त्या कथानकाचाच एक भाग आहोत आणि त्रयस्थ दृष्टीने हे सर्व शेजारीच घडणारे घटनाक्रम पाहतो आहोत असा सुखद अनुभव येतो.

करारचे कथानक अंबरीश, रजनीश, रेवा या तीन प्रमुख व्यक्तिरेखांभोवती फिरते. 'तू करारावर सही कर म्हणजे तुझा हेतू साध्य होईल आणि माझाही' छद्मीपणे हसत तो उद्गारला. या वाक्याने करार कादंबरीची सुरुवात होते. पहिलं पान वाचताना मनात कथानकाचे असंख्य धागे आपण मनातल्या मनात विणतो. मात्र शंकाकुशंकांचे पीळ अधूनमधून पडत राहतात. नवरा असा कसा वागू शकेल? या विचारात 'बिच्चारी' असं नकळत उद्गार मुखातून बाहेर पडतात आणि पुढे पुढे कथानक मनाची पकड घेत राहतं. रेवा आणि रजनीश यांच्यामधला प्रेमांकुर रुजवण्यासाठी अनेक प्रसंग रंगवताना लेखिकेने रुबी नावाच्या कुत्रीची योजना केली आहे. ती थेट आपल्याला हम आप के है कौनची आठवण करून देते. त्यांच्यामधला रोमान्स फुलवण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला आहे. प्रेमाच्या सागरात वाचक तल्लीन होऊन जातोय न जातोय तोच एका अपघाताच्या निमित्ताने कथानकाला ट्विस्ट मिळतो. नायिकेप्रमाणेच वाचकांना अनपेक्षितपणे दुःखाच्या प्रसंगात ओढतो. ‘अरेरे’ असे नकळत उद्गार बाहेर पडतात आणि ती करुण भावना कादंबरीत वाचकांना खिळवून ठेवते. ‘करार’ कादंबरी एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधित्व करते असे लेखिकेच्या लेखन शैलीवरून जाणवते. मात्र सोशिक, पतीसाठी, सौभाग्यासाठी वाटेल ते त्रास, दुःख, हालअपेष्टा सहन करणारी नायिका आपल्याला ७०-८० च्या दशकात  नेते.    

लेखिकेने याआधी ‘गोष्ट तुझी माझी’ ही लघु कादंबरी लिहिली आहे. दीर्घ कादंबरी लेखनाचा प्रवास मनोगतात सांगताना त्यात आलेल्या अडचणी, स्वतःचा स्वभाव, मदत करणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञता, समर्पक शब्दात व्यक्त केली आहे. हे मनोगत वाचल्यावर त्या व्यक्ती, प्रसंग वाचकांसमोर त्यांच्याबद्दलचे धूसरसे चित्र तयार करते. योग्य आणि समर्पक शब्दात प्रस्तावना लिहिलेल्या अॅड. अपर्णा प्रभू यांनी कादंबरीविषयी उत्सुकता वाढवत नेली आहे. करारची ओघवती, प्रवाही लेखनशैली, खिळवून ठेवणारे कथानक आणि प्रेम कथेचा शेवट नक्की काय असेल याचे आडाखे बांधत वाचक कादंबरीत गुंग होत जातो.

‘सोनचाफा प्रकाशन’, अस्नोडा गोवा यांनी प्रकाशित केलेल्या ‘करार’ कादंबरीची अक्षर जुळवणी आणि मुखपृष्ठ मांडणी ‘शब्दमित्र सोल्यूशन्स’ ने खूप सुंदर आणि सुबक केली आहे.

ही प्रेम कथा यशस्वी होते का? नायिका रेवा, नायक रजनीश, खलनायक म्हणून राग येणारा अंबरीश यांच्या भूमिका व त्यांच्यातील संवाद यांच्यातील संबंध नक्की काय आहेत? घरातले एकत्रित कुटुंब नक्की काय करते? असं काय घडलं की ज्यामुळे करार पत्रावर रेवाला सही करावी लागली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे करार कादंबरीत नक्की मिळतील.

त्यासाठी कादंबरी वाचलीच पाहिजे!



-  मंजिरी मयुरेश वाटवे