त्याच्या जीवनात तिचं स्थान

तरुण वयात आई नावाची मैत्रीण त्याला हवी असते, जिच्याजवळ तो आपले भावविश्व उघड करू शकेल. नंतर त्याच्या आयुष्यात ज्या स्त्रिया येतात त्यांच्याकडून तो जगणं शिकतो. त्याच्या मनाची जडणघडण होते.

Story: मनातलं |
22nd March, 05:38 am
त्याच्या जीवनात तिचं स्थान

आदम आणि इव्ह यांच्या जोडीबरोबर तिचं त्याच्याशी एक नातं जुळलं गेलेयं, त्यामागचं मूळ कारण जरी वंश सातत्य किंवा पुनरुत्पादन असलं तरी निसर्गानेच त्याच्या जीवनातलं तिचं स्थान दृढ बनवलं आहे. आताच्या जमान्यात स्त्री पुरुष समानतेचे वारे जरी वहात असले तरी प्रत्यक्षात तसा प्रत्यय येतो का? वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्याशी असलेलं त्याचं नातं हे एक वेगळंच भावविश्व साकारत असतं. अगदी गर्भात असल्यापासून त्याची आईशी नाळ जुळलेली असते. आई त्याची सर्वस्व असते. दोघांमध्ये एक बॉंडिंग असतं. वयाच्या प्रत्येक वळणावर तिने त्याच्या चुका पोटात घालत त्याच्यावर मायेची पाखर घालावी अशी त्याची अपेक्षा असते. तिच त्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते हा विश्वास त्याला असतो. तरुण वयात आई नावाची मैत्रीण त्याला हवी असते जिच्याजवळ तो आपले भावविश्व उघड करू शकेल. नंतर त्याच्या आयुष्यात ज्या स्त्रिया येतात त्यांच्याकडून तो जगणं शिकतो. त्याच्या मनाची जडणघडण होते. मग ती बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, आत्या, आज्जी, मावशी, मामी, काकी, वहिनी, सून कुणीही असू शकेल. कधी कधी त्याला मोह पाशात गुंतवून ठेवणारी त्याच्यावर अधिराज्य करू पाहणारी, कधी; लडिवाळपणे माया करणारी, हेतुपुरस्सर दुखवणारी, त्याच्या हृदयात घर करून राहणारी, आयुष्यभरची साथ देणारी, तर कधी मध्येच सोडून जाणारी, आयुष्यभरची भळभळती जखम देऊन जाणारी, कुणी त्यावर फुंकर घालणारी अशा कितीतरी रूपांनी ती त्याच्या आयुष्यात प्रवेश करत असते. कधी त्याला तिच्याविषयी अतीव मायाममता वाटत असते, कुणाविषयी शारीरिक आकर्षण, कधी द्वेष, असूया, कधी अधिकार, कधी अवहेलना, कधी उपहास, कधी मालकी हक्क, कधी काळजी, कधी राग अशा अनेक भावभावनांनी त्याच्या आयुष्यात ती आपले आधिपत्य गाजवत असते. 

शाळेत असल्यापासून त्याला ओढ वाटावी अशी कुणीतरी खास त्याच्या मनात वसलेली असते कधी टीचर असू शकते किंवा शालेय मैत्रीण जिच्या सहवासात रहाणं बोलणं त्याला आवडू लागतं. पुढे मैत्रिणीच्या रूपात तो आपली सहचरी शोधत असतो. कधी त्याचा स्वभाव भ्रमरासारखा गुंजारव करत फिरत राहणारा असला तरी तिने मात्र त्याच्याशी एकनिष्ठ रहावं अशी त्याची अपेक्षा असते. तनामनाने ती फक्त त्याची व्हावी ही धारणा असते. विवाहानंतर तीच त्याची सहचरी बनली तरी पूर्वीचे त्यांचे नाते तसेच राहील अशी काही शाश्वती नसते. त्याने त्याला जे हवं ते मिळवलं ही जेत्याची भावना कधी कधी हावी होत जाते. कधी तिच्यापेक्षा सरस असं काही दिसलं तर तो तिकडे आकर्षित होऊ शकतो अर्थात सर्वच पुरुषांची मनोवृत्ती अशी असते असे नाही. संपूर्णपणे एकनिष्ठ राहणारे अपवादही असतात. लहानपणापासून त्याच्या मनावर धर्म, संस्कृती, घरचे रितीरिवाज यांचा पगडा असतो त्यावर त्याचं वागणं ठरतं. राजाला अनेक राण्या म्हणजे बायका करायचं स्वातंत्र्य असतं याचं मूळ कारण राज्यप्रसाराचं असलं तरी ते दरवेळी खरं असतंच असं नाही. रानटी लोक टोळ्यांनी रहात होते तेव्हा स्त्री ही त्यांची संपत्ती होती. नंतर परिस्थिती बदलत गेली आज स्त्री ही स्वतःला पुरुषांच्या बरोबरीने सिद्ध करू शकते. आपल्या संस्कृती आणि कायदेशीर समाजामुळे त्याला मनातून वाटत असलं तरीही एक पत्नी व्रत आचरावं लागतं. पूर्वी लग्नाच्या बायकोशिवाय अंगवस्त्र ठेवायची पद्धत होती त्यावेळी नाचगाणी करून चेहऱ्याची रंगरंगोटी करून आपल्या समोर अदाकारी पेश करणारी स्त्री ही त्याचं आकर्षण ठरत होती. पण आपल्या बायकोने मात्र चार भिंतींच्या आत आपली लाज आणि कुटुंब सांभाळून राहिलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असे आजही आहे. त्याच्यापेक्षा वरचढ किंवा डोईजड झालेली ती त्याला नको असते. कायम त्याच्या आज्ञेत तिने राहावं असंच त्याला वाटतं. मध्यमवर्गीय पुरुषाचा परीघ म्हणजे शाळा, कॉलेज, नोकरी, राज्य, देश-विदेश, नातेवाईक यात दिसलेल्या आणि भेटलेल्या स्त्रिया त्या वेगवेगळ्या आचाराच्या, आकाराच्या, संस्काराच्या  स्वभावाच्या, राहणीमानाच्या असू शकतात. 

रस्त्याच्या कडेला भीक मागणारी अर्ध वस्त्रातली स्त्री पाहून त्याच्या मनात करुणा दाटून येईल, तर सिग्नलला तान्ह्या बाळाला छातीशी घेऊन काही विकणारी स्त्री त्याच्या मनात दया उत्पन्न करेल. लहान मुलीवरचे अत्याचार पाहून त्याचे पित्त खवळेल, तर ट्रेनमध्ये दिवसभर कामामुळे शिणल्या पावलांनी घरी परतणाऱ्या गृहिणीबद्दल धन्यता वाटेल. धुणी भांडी करून दारुड्या नवऱ्यासोबत संसार चालवणाऱ्या स्त्रियांविषयी त्याच्या मनात आदराची भावना असेल. तर कधी हॉट मरीलीन मॅनरोचे चित्र पाहून त्याच्या मनात कामवासना जागी होईल, कुठलीतरी हिरॉईन त्याची खास आवडीची असेल तर शर्मिला टागोरच्या गालावरच्या खळीत त्याचं मन अडकेल. स्त्रीकडे आकर्षित होण्याचं कारण फक्त शारीरिक कधीच नसतं तर कुणी अभिनयाचा, कुणी आवाजाचा, कुणी साधेपणाचा, कुणी स्मार्टपणाचा दिवाना असू शकतो. प्रत्येक स्त्रीविषयी त्याच्या मनात एक वेगळी भावना, वेगळा समज, ग्रह असू शकतो. 

देशाचा संसारगाडा हाकण्यासाठी स्वत:च्या वैवाहिक जीवनाला बाजूला ठेवून पत्नीचा त्याग करणारा पंतप्रधान असू दे. त्याच्याही मनात तिच्याविषयी काहीतरी खास अशी जागा असेल, खास अशी भावना असेल, तिचे अदृश्य असे स्थान असेल. हे झाले सगळे माझ्या मनातले विचार. ‘त्याच्या’ जागी स्वत:ला ठेवून केलेला विचार झाला.  प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळी असू शकते. कारण मी एक स्त्री माझ्या दृष्टिकोनातून विचार केलाय त्यात त्रुटी असतीलच यात शंका नाही. त्याच्या मनाचा ठाव घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.    


प्रतिभा कारंजकर, फोंडा